Married Women’s Suicide: भारतामध्ये हुंडा, घरगुती हिंसाचार व पितृसत्ताक दबावामुळे विवाहित महिलांमधील आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार दररोज ६१ गृहिणी आत्महत्या करतात. संसदेत व्यक्त झालेल्या चिंतेसह सविस्तर विश्लेषण.
भारतामध्ये विवाहाला संस्कार, सुरक्षितता आणि आयुष्यभराच्या सोबतीचे प्रतीक मानले जाते. मात्र याच विवाहसंस्थेच्या आडोशाखाली आज असंख्य विवाहित महिलांचे आयुष्य मूक वेदना, छळ, एकाकीपणा आणि शेवटी आत्महत्येच्या टोकावर पोहोचत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, मानसिक छळ आणि पितृसत्ताक सामाजिक दबाव यांसारख्या विवाहाशी संबंधित कारणांमुळे विवाहित महिलांमधील आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.
धक्कादायक आकडेवारी : दररोज ६१ गृहिणी आत्महत्येचा मार्ग निवडतात
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, भारतात दररोज सरासरी ६१ गृहिणी आत्महत्या करतात. ही आकडेवारी केवळ संख्या नसून, ती प्रत्येक दिवसाला उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांची, पोरक्या होणाऱ्या मुलांची आणि कायमस्वरूपी जखमा घेऊन जगणाऱ्या पालकांची कहाणी आहे. विशेषतः १५ ते २९ वयोगटातील तरुण विवाहित महिलांना या धोक्याचा सर्वाधिक सामना करावा लागत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

संसदेत गंभीर चर्चा; २०२३ चे आकडे देशासमोर
या गंभीर प्रश्नाकडे अखेर संसदेत लक्ष वेधण्यात आले. मंगळवारी राज्यसभेत विवाहाशी संबंधित कारणांमुळे होणाऱ्या आत्महत्यांच्या वाढत्या संख्येबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. मुस्लीम लीगचे खासदार हरीस बीरन यांनी NCRB च्या आकडेवारीचा संदर्भ देत सांगितले की, २०२३ मध्ये देशात एकूण १,७१,४१८ आत्महत्यांची नोंद झाली, त्यापैकी बहुतांश आत्महत्यांचे मूळ कारण वैवाहिक समस्या असल्याचे दिसून येते.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, एकूण महिला आत्महत्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक आत्महत्या विवाहित महिलांच्या आहेत. हे चित्र केवळ कायदा-सुव्यवस्थेचे नाही, तर सामाजिक आणि नैतिक अपयशाचेही द्योतक आहे.
कारणांचा गुंता : समाज, अर्थकारण आणि मानसिक आरोग्य
सामाजिक-सांस्कृतिक बंधने, आर्थिक परावलंबन, शिक्षणाचा अभाव आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या ही आत्महत्येमागील प्रमुख कारणे ठरत आहेत. आर्थिक स्वातंत्र्य नसल्याने अनेक महिला अत्याचार सहन करत राहतात. सातत्याने होणारा अपमान, भेदभाव, सामाजिक दबाव आणि “तडजोड कर” अशी अपेक्षा महिलांचा आत्मविश्वास खच्चीकरण करते आणि त्यातून नैराश्य, चिंता, असहायता यांसारख्या मानसिक समस्या उद्भवतात. याच मानसिक अवस्थेचा शेवट अनेकदा आत्महत्येत होतो.
“नैतिक, कायदेशीर आणि संस्थात्मक अपयश”
राज्यसभेत शून्यकालादरम्यान केरळच्या खासदारांनी या संकटाला “नैतिक, कायदेशीर आणि संस्थात्मक अपयश” असे ठामपणे संबोधले. भारतीय परंपरेत विवाहाला पवित्र मानले जाते; मात्र वास्तवात अनेक महिलांसाठी तो दुःख, एकाकीपणा आणि निराशेचा दीर्घकाळ चालणारा प्रवास ठरत आहे.
समर्थन व्यवस्थेचे अपयश, हुंड्याच्या सततच्या मागण्या आणि भावनिक दुर्लक्ष यांचे परिणाम अत्यंत विनाशकारी ठरत आहेत. विवाहित महिलांच्या सुरक्षेसाठी भारतात हुंडाबंदी कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा यांसारख्या मजबूत कायदेशीर तरतुदी अस्तित्वात आहेत, पण त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे वास्तव आहे.
कायदे आहेत, अंमलबजावणी अपुरी
“आपल्याकडे कायद्यांची कमतरता नाही,” असे खासदारांनी ठामपणे सांगितले. “जगातील काही अत्यंत मजबूत कायदे आपल्या देशात आहेत; पण कटू सत्य असे आहे की आपण त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलो आहोत.”
अनेक दशकांपासून कायदे अस्तित्वात असतानाही हुंड्याशी संबंधित छळ हा नवविवाहित महिलांमधील अप्राकृतिक मृत्यूंचे सर्वात सामान्य कारण ठरत आहे. वधूचे कमी शिक्षण, आर्थिक ताणतणाव, नव्या कुटुंबात जुळवून घेण्यातील अडचणी, कमी शिक्षा आणि संथ तपास प्रक्रिया यामुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढते.
आरोग्याचा दुर्लक्षित पैलू
खासदारांनी महिलांच्या आरोग्यसेवेच्या पैलूवरही महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. मासिक पाळी, गर्भावस्था आणि स्तनपानाच्या काळात महिलांच्या भावनिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. या अत्यंत नाजूक टप्प्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव, भावनिक दुर्लक्ष किंवा वैवाहिक आयुष्यातील विसंवाद महिलांना चुकीचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करू शकतो.
Suicides among married women in India are rising due to dowry harassment, domestic violence and patriarchal pressure. NCRB data reveals an alarming trend, raising serious concerns in Parliament. Read the detailed analysis.
उपाय काय?
कुटुंबपातळीवर जनजागृती, समुपदेशन, तसेच समुदाय-आधारित सहाय्य प्रणाली उभारणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक आत्महत्या ही केवळ एका महिलेचा मृत्यू नसून, ती एका कुटुंबाचा ऱ्हास, पालकांसाठी आयुष्यभराचा आघात आणि मुलांच्या आयुष्यावर कायमचे खोल व्रण उमटवणारी घटना असते.
फक्त कागदावर असलेले कायदे पुरेसे नाहीत. कायद्यांची सहानुभूतीपूर्ण अंमलबजावणी, संस्थात्मक जबाबदारी आणि राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर सामाजिक सुधारणा घडवून आणणे अत्यावश्यक आहे.
शेवटचा, पण झणझणीत संदेश
खासदारांनी आपल्या भाषणाचा शेवट अत्यंत विचार करायला लावणाऱ्या शब्दांत केला—
“छळ फक्त मारहाणीमुळेच होतो असे नाही. कधी कधी तर गप्प राहणेसुद्धा जीव घेऊ शकते.”
हा इशारा केवळ संसदेसाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी आहे. कारण, महिलांचे मौन तोडले नाही, तर ही आकडेवारी आणखी भयावह होण्यास वेळ लागणार नाही.
