महात्मा गांधी : अनेक देशांनी गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा केला अंगिकार
महात्मा गांधी यांचा जन्म जरी 20व्या शतकात झाला असला तरी आजच्या 21व्या शतकातही त्यांची शिकवण आणि तत्त्वज्ञान तितकीच महत्त्वाची ठरते. जगभरातील अनेक देशांनी गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार करून आपल्या सामाजिक आणि राजकीय समस्यांचे निराकरण केले आहे. त्यांचा विचार, सत्याग्रह, स्वावलंबन आणि नैतिकतेचा आग्रह आजच्या तरुणांना एका नव्या विचाराच्या दिशेने नेतो.
अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी गांधीजींविषयी केलेले विधान आजही स्मरणात आहे – “भविष्यातील पिढ्यांना विश्वास ठेवणे कठीण जाईल की हाड-मांसाने बनलेला असा एक व्यक्ती पृथ्वीवर चालत होता.” या विधानात आइन्स्टाईन यांनी गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्याच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्यपूर्ण महती सांगितली आहे. विशेष म्हणजे, आजही अनेक तरुण गांधींच्या विचारांना जाणून घेण्यास उत्सुक आहेत. हीच ती पिढी आहे जी गांधींच्या विचारांना अनेक अडचणींना तोंड देत असताना सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय तरुणाईची भूमिका
भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, ज्यात 65% लोकसंख्या 40 वर्षांच्या आतील आहे. इतिहासाच्या पटलावर नेहमीच तरुणांनीच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणले आहे. परंतु सध्याच्या काळात भारतातील तरुण वर्ग अनेक अडचणींचा सामना करत आहे. शिक्षणातील असमानता, बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि मानसिक आरोग्याच्या समस्या तरुणांना एक विचलित मार्गाकडे खेचत आहेत. तरुण हे भविष्यकाळाचे शिल्पकार असतात, ते समाजाच्या पुनर्रचनेचे प्रमुख घटक आहेत. गांधींनी तरुणांना नेहमीच सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले. त्यांचे मत होते की तरुणच समाजातील अंधश्रद्धा, कुरीती आणि अन्यायाचा नायनाट करू शकतात.
शिक्षण, बेरोजगारी आणि नैतिकता
गांधीजींचे शिक्षणाबद्दलचे विचार आजच्या काळात विशेष महत्त्वाचे ठरतात. त्यांनी एक अशा शिक्षणपद्धतीचा आग्रह धरला होता जी केवळ माहितीचे संकलन न करता विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास, आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष निर्माण करेल. आज, शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे असे झाले आहे, परंतु गांधीजींच्या मते शिक्षण हे समाजातील नैतिक मूल्यांची स्थापना करण्याचे एक माध्यम असले पाहिजे. आज नैतिक शिक्षणाच्या अभावामुळे अनेक तरुण हिंसा, गुन्हेगारी आणि व्यसनांच्या आहारी जात आहेत.
महात्मा गांधीजींनी बेरोजगारीचे निराकरण करण्यासाठी कुटीर उद्योगांचे महत्त्व मांडले होते. त्यांच्या मते, देशातील तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण आवश्यक आहे. त्यांनी हस्तकला, शेती, सूत कताई यांसारख्या पारंपरिक व्यवसायांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मते, शिक्षणाने व्यक्तीला नीतिमूल्ये प्राप्त करून देणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे.
तरुणांचे सामाजिक योगदान
महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यातील तरुण पिढीला नेहमीच रचनात्मक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाद्वारे तरुणांना सुसंस्कृत, शिस्तबद्ध आणि अनुशासित राहण्याचे धडे दिले. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी सदैव तरुणांना अहिंसक आंदोलनाचे मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांनीदेखील त्यांच्या या विचारांचा स्वीकार केला पाहिजे. त्यांच्या अहिंसा, सत्य आणि शिस्त यांचे पालन करून तरुण वर्ग समाजात शांतता आणि स्थैर्य आणू शकतो.
महिला सबलीकरण आणि स्त्रीशिक्षा
महात्मा गांधी स्त्रीशिक्षेचे आणि महिला स्वावलंबनाचे कट्टर समर्थक होते. त्यांचे मत होते की, जर एक पुरुष शिकला तर फक्त एक व्यक्ती सुशिक्षित होते, परंतु जर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. गांधींनी महिलांच्या स्वावलंबनासाठी अनेक धोरणे मांडली होती आणि स्त्रियांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी काम केले होते. त्यांचा विश्वास होता की महिलांमध्ये समाजाच्या परिवर्तनाची क्षमता प्रचंड आहे आणि त्यांचे शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा कणा आहे.
तरुणांसाठी महात्मा गांधी विचारांचे महत्त्व
आजच्या काळात अनेक तरुण सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये सामील होत असताना, महात्मा गांधींचे विचार त्यांना नवीन दिशा देतात. सोशल मीडियाच्या प्रभावाखाली अनेक चुकीचे विचार आणि अपप्रचार तरुणांच्या मनात रुजत असले तरीही, त्यांच्यामध्ये गांधींच्या विचारांविषयी कुतूहल आहे. तरुणांच्या मनात गांधींच्या अहिंसेबद्दल एक आदर आहे, ज्यातून अनेक जनआंदोलनांमध्ये तरुणांनी निर्णायक भूमिका बजावली आहे.
सध्याची परिस्थिती आणि तरुणांचे आव्हान
आजच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात तरुण शक्तीचा उपयोग अनेकदा राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार करून तरुणांनी समाजात प्रेम, एकता आणि सौहार्द प्रस्थापित केले पाहिजे. हिंसा आणि द्वेषाच्या मार्गावर चालल्यास कोणत्याही समस्येचे समाधान होणार नाही, याची जाणीव तरुणांनी ठेवली पाहिजे. महात्मा गांधींचे विचार केवळ आजच्या समस्यांसाठी नव्हे तर भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी सुद्धा सुसंगत ठरतात.
महात्मा गांधीजींचे जीवन आणि त्यांचे विचार हे तरुणांसाठी एक आदर्श आहेत. ते केवळ एक व्यक्ती नव्हते, तर एक विचारधारा होते, जी कालातीत आहे. महात्मा गांधींची शिकवण आजही तरुणांना स्फूर्ती देत राहील आणि त्यांना एक नवी दिशा देत राहील. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊनच तरुणाईने राष्ट्राच्या उन्नतीसाठी पुढे यावे.