मुलींच्या विनयभंग प्रकरणाने खळबळ
लातूर,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
महाराष्ट्राला हादरवाणारी घटना मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यात घडली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य शाळेच्या मुख्याध्यापकानेच केला आहे. एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच्याच शाळेत शिकणा-या 14 मुलींचा विनयभंग केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पिडीत मुलींचे पालक संतप्त झाले आहेत.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात शनिवारी (ता. ३०) गुन्हा दाखल झाला. शिक्षण विभागाने त्याच्यावर निलंबनाची कारवाईही केली आहे. या निंदनीय प्रकरणामुळे शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत, संबंधित मुख्याध्यापकाला तातडीनं निलंबित करण्यात आलं आहे. अप्पा श्रीरंग नरसिंगे (वय ४५, रा. बोधेनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिली पोलिसांत फिर्याद
अप्पा श्रीरंग नरसिंगे जिल्हा परिषदेच्या लातूर तालुक्यातील एका शाळेत कार्यरत होता. शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य बोलणे, अश्लील भाषा वापरणे, हात-पाय चेपून द्यायला सांगणे असे प्रकार तो करीत होता. विद्यार्थिनींमध्ये भीतीचे त्यामुळे वातावरण निर्माण झाले होते. मुलींसोबत असभ्य वर्तन सुरू असल्याची बाब गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाला याबाबतची माहिती दिली.
सातत्याने येत असलेल्या विविध तक्रारी, सत्यता पडताळूण गटशिक्षण अधिकारी निवृत्ती जाधव यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित नरसिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
पिडीत मुलींनी पालकांकडे याची तक्रार केली. यानंतर पालकांनी शाळेतील शिक्षकांकडे याबाबत विचारणा केली. गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली. यानंतर शाळेत विशाखा समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत पिडीत विद्यार्थीनींच्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकानेच मुलींचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. यानंतर या मुख्याध्यापकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच या शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईतील भांडुपमधील शाळेत देखील विचित्र प्रकार घडला आहे. भांडुपमधील नामांकित शाळेत तीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे..शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडुपच्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. गोपाल गौडा असे आरोपीचं नाव आहे..विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीने शाळेच्या प्रशासनाने गोपाल गौडाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.