Maha-Deva Project: राज्यपाल महोदयांच्या सूचनांनुसार प्रत्येक महाविद्यालयातील खेळाडूंची नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. कोणता खेळाडू कोणता खेळ खेळतो, याची सविस्तर माहिती भारत स्पोर्ट्स पोर्टलवर नोंदवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे.
Under the Maha-Deva Project, Maharashtra universities and colleges have been instructed to register all athletes on the Bharat Sports Portal and form football teams to strengthen sports development.
मुंबई, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
राज्यातील सर्व विद्यापीठांअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील प्रत्येक खेळाडूची भारत स्पोर्ट्स पोर्टलवर नोंदणी करून ‘महा-देवा प्रोजेक्ट’ अंतर्गत फुटबॉल टीम तयार करण्याचे स्पष्ट निर्देश राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. यामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून खेळाडूंची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.

लोकभवन येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक
‘लोकभवन’ येथे महा-देवा प्रोजेक्ट तसेच राज्यातील विविध खेळांच्या प्रगतीसंदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती, लोकभवनमधील सह संचालक विकास कुलकर्णी, तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे क्रीडा विभाग संचालक उपस्थित होते.
प्रत्येक खेळाडूची नोंद – महत्त्वाचा टप्पा
डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले की, राज्यपाल महोदयांच्या सूचनांनुसार प्रत्येक महाविद्यालयातील खेळाडूंची नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. कोणता खेळाडू कोणता खेळ खेळतो, याची सविस्तर माहिती भारत स्पोर्ट्स पोर्टलवर नोंदवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विशेष मोहीम राबवावी.
सर्व विद्यापीठांनी आपल्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांच्या क्रीडा संचालकांना याबाबत स्पष्ट आणि तातडीच्या सूचना द्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
Maharashtra Governor’s Secretary directs all universities and colleges to register athletes on the Bharat Sports Portal under the Maha-Deva Project and form football teams to promote sports excellence. | Maharashtra Sports News
छत्रपती शिवाजी क्रीडा प्रतिष्ठानची महत्त्वाची भूमिका
छत्रपती शिवाजी क्रीडा प्रतिष्ठानने या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे सांगताना डॉ. नारनवरे म्हणाले की, ॲथलेटिक्स, कबड्डी तसेच इतर विविध खेळांतील खेळाडूंची नोंद एकत्रित स्वरूपात उपलब्ध झाल्यास क्रीडा नियोजन अधिक प्रभावी होईल.
या कामाचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार असून, प्रत्यक्ष क्रीडा अधिकाऱ्यांनी शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन खेळाडूंमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकाच प्लॅटफॉर्मवर खेळाडूंची संपूर्ण माहिती
भारत स्पोर्ट्स पोर्टलवर प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र अकाउंट तयार झाल्यानंतर त्याची क्रीडा कामगिरी, सहभाग, स्पर्धा व प्रगती यासंबंधीची सर्व माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. यामुळे खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
महा-देवा प्रोजेक्टमुळे क्रीडा क्षेत्राला चालना
खेळाडूंची नोंद पूर्ण झाल्यानंतर स्थानिक, विद्यापीठ, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन सुलभ होईल, असे डॉ. नारनवरे यांनी सांगितले. यामुळे भविष्यात दर्जेदार खेळाडू घडण्यास मोठी मदत होणार आहे.
फुटबॉलसाठी विशेष भर
महाराष्ट्र शासनाचा ‘महा-देवा- प्रोजेक्ट’ सुरू झाला असून, त्याअंतर्गत फुटबॉलसाठी विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. नुकतेच जागतिक फुटबॉलपटू लिओनोल मेस्सी मुंबईत येऊन गेले, याचा उल्लेख करत डॉ. नारनवरे म्हणाले की, प्रत्येक महाविद्यालयाने स्वतःची फुटबॉल टीम तयार करावी, जेणेकरून राज्यातून दर्जेदार फुटबॉलपटू तयार होतील.

सर्वांच्या सहकार्याने क्रीडा क्षेत्रात नवे पर्व
सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, क्रीडा अधिकारी आणि खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यास राज्यातील प्रत्येक खेळाडूची अचूक नोंदणी होऊन महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकेल, असा विश्वासही डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केला.
