पातालपानी ते कालाकुंड हेरिटेज ट्रेनचा रोमांचक प्रवास
जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि या पावसाळी मोसमात सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद लुटायचा असेल, तर मध्य प्रदेशातील इंदौरपासून काही अंतरावर असलेल्या पातालपानी ते कालाकुंड या प्रवासाला हेरिटेज ट्रेनने जायला हरकत नाही. आज इथे आपण या ट्रेनच्या रोमांचक प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
पावसाळ्यात निसर्गाने सर्वत्र हिरवाईचा साज चढवलेला असतो. अशा वेळी साधारण नैसर्गिक दृश्येही खूपच सुंदर आणि मनमोहक वाटू लागतात. अशा परिस्थितीत पावसाने भिजलेल्या घाटांमध्ये ट्रान्सपेरेंट ग्लास असलेल्या ट्रेनच्या आत गरमागरम चहाची चुस्की घेत हिरवाईने नटलेल्या परिसरातून जाताना जो आनंद आणि रोमांच मिळतो, तो शब्दांत व्यक्त करता येत नाही. अशाच रोमांचक प्रवासाचा आनंद तुम्हीही हेरिटेज ट्रेनमध्ये घेऊ शकता.
हे देखील वाचा: typing online jobs: टायपिंग करून ऑनलाइन जॉबद्वारे करा लाखोंची कमाई
बोर्डिंग पॉइंट आणि डेस्टिनेशन
पातालपानी ते कालाकुंड हेरिटेज ट्रेन आठवड्यातून दोन दिवस, फक्त शनिवारी आणि रविवारी धावते. कारण या दोन दिवसांत सर्वाधिक पर्यटक येतात. या दिवसांत ती फक्त एकच फेरी करते. या ट्रेनमध्ये दोन एसी चेयरकार आणि तीन नॉन-एसी चेयरकार आहेत. एका कोचमध्ये साठ प्रवासी बसून बाहेरील नैसर्गिक दृश्ये पाहू शकतात. ही ट्रेन सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी पातालपानी येथून निघून दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी कालाकुंड येथे पोहोचते.
ही हेरिटेज ट्रेन इंदौरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या पातालपानी ते कालाकुंड दरम्यान सुमारे 12 किलोमीटरचा प्रवास दोन तासांत पूर्ण करते. प्रवास धीम्या गतीने करण्याचा उद्देश हा आहे की यात बसलेल्या पर्यटकांना शांतपणे निसर्गाच्या हिरव्यागार सुंदर अशा दृश्यांचा आणि धबधब्यांचा आनंद घेता यावा.
दिसतात मोहक नैसर्गिक दृश्ये
नैसर्गिक सौंदर्याने नटलेले पातालपानी ते कालाकुंड दरम्यानचे क्षेत्र हिरवाई आणि टेकड्यांनी वेढलेले आहे. पावसाळ्यात येथे पृथ्वी हिरवाईची चादर ओढते. येथील मुख्य धबधबा 150 फूट उंचीवरून खाली कोसळतो. परंतु त्याची खोली अजूनपर्यंत कळलेली नाही, म्हणून याला ‘पातालपानी’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचे सौंदर्य अत्यंत आकर्षक आहे. याच कारणामुळे हे ठिकाण वर्षानुवर्षे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
निसर्गाच्या निकट थांबण्याची संधी
प्रवासादरम्यान रेल्वेच्या आतून नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेतल्यानंतर, ट्रेनमधून खाली उतरूनही पर्यटक नैसर्गिक धबधबे, टेकड्यांची सैर करू शकतात आणि पिकनिकचा भरपूर आनंद घेऊ शकतात, यासाठी भारतीय रेल्वेने या ट्रिपसाठी एकूण पाच तासांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यामुळे हेरिटेज ट्रेन कालाकुंड येथे पोहोचल्यावर दोन तास तिथेच उभी राहते, जेणेकरून पर्यटक तेथे आरामात उतरून नैसर्गिक सौंदर्याचा आणि मालवी पदार्थ दाल बाफले आणि कालाकुंडचे प्रसिद्ध कलाकंदाचा आस्वाद घेऊ शकतील. ही ट्रेन कालाकुंड येथून दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी निघून संध्याकाळी साडेचार वाजता परत पातालपानी येथे पोहोचते.
अगोदरच आरक्षण करून घ्या
या हेरिटेज ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पसंतीनुसार एसी आणि नॉन-एसी अशा दोन्ही प्रकारच्या कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. याचे तिकीट IRCTC च्या वेबसाइटवरून ऑनलाइन बुक करता येते किंवा प्रवास स्थळावर जाऊन तिकीट काउंटरवरूनही खरेदी करता येते. परंतु गाडीत केवळ तीनशे सीट्स आहेत, त्यामुळे व्यावहारिक आणि चांगले हेच होईल की प्रवासाच्या आधी ऑनलाइन तिकीट बुक करून घ्यावे. या हेरिटेज ट्रेनच्या एसी कोचचे वन -वे तिकीट 265 रुपये आणि नॉन एसी कोचचे तिकीट फक्त 20 रुपये आहे.
हे देखील वाचा: wood apples: कवठ: चवीला आंबट-गोड असलेल्या या फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
सावधानी आवश्यक आहे
हे क्षेत्र निसर्गसौंदर्य आणि संपदांनी भरलेले असले तरी सावधानता न बाळगल्यास गंभीर अपघात होऊ शकतो. पावसाळ्यात येथे घसरड होऊ शकते. त्यामुळे निश्चित केलेल्या स्थळावरूनच/ ठिकाणांवरून नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्या. धबधब्याजवळ जाण्याचा किंवा घाटीमध्ये खाली उतरण्याचा धोका घेऊ नका. सध्या मुलांमध्ये आणि युवकांमध्ये सेल्फी आणि रील्स बनवण्याची क्रेझ आहे. परंतु अशा ठिकाणी बेसावधपणा योग्य नाही. धबधब्याजवळ जाऊन किंवा टेकडीच्या टोकावर उभे राहून सेल्फी घेणे किंवा रील बनवणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे सावधानता बाळगून प्रवासाचा आनंद घ्या.