एकास अपहरण करून जत तालुक्यातील जिरग्याळ, निगडी येथे नेले
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील काराजनगी गावात मोटारीच्या केबल तोडण्याच्या वादातून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी चौदा जणांवर जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपशील जाणून घ्या
मायप्पा कलाप्पा माने यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार, गुरुवारी दुपारी साडेएकच्या सुमारास ते ट्रॅक्टर घेऊन सुखदेव माने यांच्या घराजवळून जात होते. यावेळी राहुल माने, राजेंद्र माने आणि सुखदेव माने यांनी त्यांना अडवून ट्रॅक्टर आणि मोबाईल हिसकावून घेतले.
थोड्याच वेळात, विजय हाके, पोपट हाके, पप्पू हाके आणि इतर संशयितांनी पांढऱ्या रंगाची बुलेरो गाडी घेऊन घटनास्थळी धडक दिली. त्यांनी मायप्पा माने यांना जबरदस्तीने गाडीत बसवून तालुक्यातील जिरग्याळ गावात नेले. त्यानंतर त्यांना निगडी येथे नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.
अपहरण, मारहाणीचे कारण काय?
संजय हाके नावाच्या व्यक्तीला केबल तोडल्याची जबरदस्ती कबुली देण्यासाठी मारहाण करण्यात आली. केबल तोडल्याची कबुली दिल्यानंतरही आरोपींनी मायप्पा माने यांना मारहाण केली आणि एक लाख रुपयांची मागणी केली. त्याशिवाय, पोलिसात तक्रार केल्यास भोसकून मारण्याची धमकीही दिली.
या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.