शाळकरी मुलगी क्लासला जाताना घडला प्रकार
आयर्विन टाइम्स / जत
जत शहरातील एका सतरा वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी मोहसीन अली रशिद मुल्ला वय २६ ( रा. संभाजी चौक, जत) या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदरची शाळकरी मुलगी शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. शिवाय सकाळी खासगी क्लासला जाते. मोहसीन अली रशिद याचे मोबाईल दुकान आहे. रशिद शाळेत जाणाऱ्या या शाळकरी मुलीकडे वाईट नजरेने बघणे, हातवारे व इशारे करणे असे प्रकार करीत होता.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सदरची शाळकरी मुलगी व तिच्या एका मैत्रिणीसोबत क्लासला जात होती. मुल्ला याने मोटरसायकलीवरून येऊन रस्त्यात तिला गाठले. मला तू आवडतेस, तुझ्यावर माझे प्रेम आहे म्हणून कॅडबरी देण्याचा प्रयत्न केला. या अचानक झालेल्या या प्रकारामुळे मुलगी घाबरली व घरी जाऊन घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी जत पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला व फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी मोबाईल दुकानातून मोहसीन अलीला ताब्यात घेतले. त्याची शहरातून धिंड काढून पोलीस ठाण्यात आणले. त्याची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.
दरम्यान, कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करीत असणाऱ्या विरोधात तात्काळ जत पोलीस ठाणे किंवा माझ्यापाशी संपर्क साधावा, असे आवाहन जतचे पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी केले.