सारांश: जत तालुक्यात शेतकऱ्याच्या घरातील सोन्याचे दागिने चोरून फरार झालेल्या सायली आणि दत्तात्रय खटके या जोडप्यास पोलिसांनी अटक केली. आरोपींनी जयसिंगपूर येथील सराफाकडे चोरीचे दागिने विकल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेत पूर्ण १.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास जत पोलिसांकडून सुरू आहे.
जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील शेतकऱ्याच्या घरातील सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या प्रतापुर (ता.जत) येथील सायली खटके आणि दत्तात्रय खटके या जोडप्यास जत पोलिसांनी अटक करून १.८० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
घटनेचा आढावा
दि. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता, फिर्यादी चंद्रकांत विलासराव शिंदे (रा. वाळेखिंडी, ता. जत) यांच्या वृद्ध आईने अंघोळीच्या वेळी सोन्याचे दागिने वॉशबेसिनजवळ ठेवले होते. त्याच वेळी घरातील नोकर असलेल्या सायली आणि दत्तात्रय खटके या जोडप्याने संगनमत करून ते दागिने लंपास केले आणि पसार झाले.
चोरी झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा दिला. मात्र दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी पोलिस हवालदार संतराम वगरे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी होळी गादी परिसरात लपले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.
कारवाईत हस्तगत मुद्देमाल
चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली देत दागिने जयसिंगपूरमधील एका सराफाकडे विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी संपूर्ण चोरीचा मुद्देमाल जप्त करून फिर्यादींना परत केला आहे.
कारवाई करणारे अधिकारी आणि पथक
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सांखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस हवालदार संतराम वगरे, पोलीस नाईक अर्जुन घोदे, पोलीस कर्मचारी राजेंद्र माळी, योगेश पाटोळे, बजरंग सरगर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सध्या सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार संतराम वगरे करीत आहेत.
हे देखील वाचा:romantic films: परंपरागत प्रेमकथांपासून वेगळ्या 5 रोमँटिक चित्रपटांची सफर
जतच्या महिलेचे साडेबारा लाखांचे दागिने चोरीस
जत शहरातील शशिकला सिद्धाप्पा पट्टणशेट्टी यांचे १२ लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने चोरून नेल्याची घटना घडली. शशिकला नातेवाईकाच्या लग्नसमारंभाला कर्नाटकात गेल्या होत्या. प्रवासादरम्यान घटना घडल्याची माहिती मिळाली असून याबाबत त्यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली.
पोलिस व मिळालेली माहिती अशी, शशिकला यांच्या नातेवाईकांचे कलबुर्गी (कर्नाटक) येथे लग्न होते. ४ तारखेला समारंभाला शशिकला सोन्याचे दागिने
नातेवाईकांकडून घालून गेल्या होत्या. तिथे गेल्यानंतर रात्री दागिने काढून बॅगेत ठेवले होते. समारंभ आटोपून ६ तारखेला परतल्या. आज सकाळी बॅग उघडून पाहिले असता दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
यात २ लाख ८० हजार किमतीचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार २ लाख १० हजाराचे, २ लाख ८० हजारचे कंगन, याच किमतीचा पोहेहार, १ लाख ५ हजारांची बोरमाळ व कर्णफुले असा १२ लाख ५२ हजाराचा ऐवज चोरीस गेला आहे. जत पोलिस अधिक तपास करीत आहेत.