जत तालुक्यातील खिलारवाडी येथील २ महिलांवर गुन्हा
जत/ आटपाडी,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
आटपाडी (जि. सांगली) येथील गुरुदत्त ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी खरेदीसाठी दाखवलेल्या दागिन्यांतील कानातील दोन टॉप्सची दुकान मालकाची नजर चुकून चोरी केल्याचा प्रकार उघड आला आहे. दुकान मालकाने पोलिसांना बोलावून महिलांची झडती घेतल्यानंतर चोरी उघड झाली. या महिला जत तालुक्यातील खिलारवाडी गावाच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
चोरीची तक्रार ज्वेलर्सचे मालक पांडुरंग देशमुख यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी सांगू ऊर्फ शोभा शिवाजी कोकरे आणि मायाक्का सुरेश लोखंडे ( खिलारवाडी ता. जत) यांच्यावर साडेतीन ग्रॅमचे २२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याचा गुन्हा दाखल केला.
आटपाडी येथील नगरपंचायत शेजारील जुन्या बाजारपेठेत पांडुरंग दत्तात्रय देशमुख (वय ५९, देशमुखवाडी) यांचे गुरुकृपा ज्वेलर्स आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी साडेदहा वाजता दुकान उघडले. दुकान उघडताच त्यांच्या पाठीमागून दोन महिलांनी दुकानात प्रवेश केला. त्यांनी कानातील टॉप्स खरेदी करायचे असून, त्याचे नमुने दाखवण्याची विनंती केली. देशमुख यांनी डब्यातील कानातील विविध प्रकारचे टॉप्स दाखवण्यासाठी म्हणून ठेवले.
नुकतेच दुकान उघडले असल्यामुळे त्यांनी झाडलोट करेपर्यंत या महिला कानातील जोड पसंत नसल्याचे सांगून निघून गेल्या. त्यानंतर देशमुख यांचे दागिन्यावर लक्ष गेले. त्यात एक जोड नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ बसस्थानक गाठले व पोलिसांना बोलावून घेतले. एका महिलेच्या हातात कानातील दोन टॉप्स आढळून आले.