जत परिसरातील बातम्या

जत परिसरातील बातम्या:
🚨 उमदी – विजयपूर महामार्गावर अपघात; जीवितहानी टळली

जत (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
उमदी – विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर लवंगा येथे शुक्रवारी (ता.१५) रात्री झालेल्या अपघातात दोन वाहने उलटली. समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक कट मारल्याने हा अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.

अहिल्यानगर – विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असून अनेक लोकांचा जीव गेला आहे. तरीदेखील प्रशासन या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची नाराजी आहे.
या मार्गावर सूचनाफलक, रेडियम मार्किंग, वळणांवर मजबूत बाजूपट्ट्या, तसेच रस्त्याची रुंदी वाढविण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मोठ्या वाहनांची गर्दी आणि अरुंद रस्ता हे अपघाताचे मुख्य कारण ठरत आहे.

या संदर्भात माजी उपसरपंच फिरोज मुल्ला यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की – “रस्त्यावर आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध न केल्यास आम्ही महामार्ग रोखण्याचा इशारा देतो.”

हेदेखील वाचा: sangli crime news: सांगली LCB ची मोठी कारवाई : 12 मोटारसायकल चोरीप्रकरणी 4 आरोपी जेरबंद

🐄 उमदी-चडचण रस्त्यावर ११ गायींसह टेम्पो पकडला

उमदी (ता. जत) येथे उमदी – चडचण रस्त्यावर शुक्रवारी (ता.१५) सकाळी ११ वाजता पोलिसांनी बेकायदेशीररीत्या गायी वाहतूक करणारा टेम्पो पकडला.

या कारवाईत ११ संकरित गायी (किंमत ₹३.६५ लाख) आणि ₹७ लाखांचा टेम्पो असा एकूण ₹१०.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी टेम्पोचालक दत्तू जगन्नाथ चव्हाण (वय ५३, रा. आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार संतोष दोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास उमदी पोलिस करीत आहेत.

जत परिसरातील बातम्या

🔐 जत शहरात घरफोडी; नऊ हजारांचा मुद्देमाल चोरी

जत शहरातील सातारा रोडवरील के. एम. हायस्कूलजवळील श्रीमती शालन आप्पा साळे यांच्या बंद घरात चोरट्यांनी हात साफ केला.

दि. ५ ते ८ ऑगस्टदरम्यान ही घटना घडली असून दि. १६ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घरफोडीत एच.पी. कंपनीच्या दोन पाण्याच्या मोटारी, टाकी आणि एलजी कंपनीचा टीव्ही असा एकूण ₹९ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

साळे या महिला आपल्या मुलांकडे गावी गेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ही चोरी केली. अधिक तपास जत पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *