सारांश: जत तालुक्यातील करजगी गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी पांडुरंग कळ्ळी याला अटक केली असून, संतप्त ग्रामस्थांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज जत बंद पुकारण्यात आला असून, विविध राजकीय पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. पोलिस तपास वेगाने सुरू असून, लवकरच आरोपीला कठोर शासन होईल, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत तालुक्यातील करजगी (जिल्हा सांगली) गावात एका निर्दयी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचे गुरुवारी (ता. ६) उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय ४५) याला अटक केली आहे.
निर्घृण कृत्याचा उलगडा
गुरुवारी सकाळी बालिकेच्या आजीने तिला शाळेत सोडण्यासाठी शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. गावभर शोधाशोध करूनही तिचा थांगपत्ता लागत नव्हता, त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर गावात दवंडी देण्यात आली व उमदी पोलिसांना माहिती कळवण्यात आली.
पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. यादरम्यान, गावातील एका पत्र्याच्या शेडजवळ संशयित आरोपी पांडुरंग कळ्ळी हा मद्यधुंद अवस्थेत झोपलेला आढळला. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सकाळी नऊच्या सुमारास खेळणाऱ्या चिमुकलीला फूस लावून पत्र्याच्या शेडमध्ये नेले, तिच्यावर अमानुष अत्याचार केला व नंतर तिचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे, तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात कोंबून पेटीत ठेवला होता.
गावात संतापाची लाट, आज जत बंद
या अमानुष घटनेने जत तालुका हादरला असून, संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष तसेच व्यापारी संघटनांनी आज (ता. ७) जत बंदची हाक दिली आहे. दुपारी जत शहरात आरोपीस कठोर शासनाची मागणी करत मोर्चा काढण्यात येणार आहे.
आजीचा आक्रोश
पीडित बालिका सध्या तिच्या आजीकडे राहत होती. तिचे आई-वडील रत्नागिरी येथे मजुरीसाठी गेले होते, तर तिची आई प्रसूतीसाठी कर्नाटकातील मुधोळ येथे होती. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सकाळी दहाच्या सुमारास बालवाडीत सोडण्यासाठी आजीने बालिकेचा शोध सुरू केला. नंतर तिचे पार्थिव पाहून आजीने जागेवरच हंबरडा फोडला.
हे देखील वाचा: miraj crime news: मिरज येथे मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक: 6 मोटारसायकली जप्त
आजीची ती अवस्था पाहून सर्वांचे डोळे पानावले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या ग्रामीण रुग्णालयात पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू असा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
गावात शोकाकुल वातावरण
सायंकाळी बालिकेचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला व नंतर शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. बालिकेचे पार्थिव पाहताच तिच्या आजीने हंबरडा फोडला. गावातील वातावरण अत्यंत शोकाकुल बनले असून, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आहेत.
आरोपीस कठोर शिक्षा द्यावी – ग्रामस्थांची मागणी
गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीस लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला व आरोपीला कठोर शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
पोलिसांचा तपास वेगाने सुरू
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले की, “प्रकरण गंभीर असून, तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीस कठोर शिक्षा होईल, याची काळजी घेतली जाईल. वैद्यकीय अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता न्यायसंस्थेने वेगाने कार्यवाही करून आरोपीस कठोर शासन करावे, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.
लेकीच्या मृत्यूने आईचा हृदय पिळवटणारा आक्रोश
आई बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. एक मुलगी सोबत होती. मोठी मुलगी अंगणवाडीला जात असल्यामुळे दीर आणि सासूबाईंच्या जवळ सोडून नव्या बाळाच्या स्वप्नात ती रमली होती; पण त्या आनंदावर गुरुवारी विरजण पडले. तिच्या पोटच्या गोळ्यावर एका नराधमाने अत्याचार केले आणि तिचा खून केला.
घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आनंदाच्या स्वप्नात रमणाऱ्या त्या माऊलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लेकीला कवटाळण्याची वेळ आली. तिचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून ग्रामस्थांचे मन हेलावून गेले.
जत तालुक्यातील करजगी गावात चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची घटना संताप आणणारी आहे. त्यामागची गोष्ट वेदनादायी आहे. तिचे वडील कोकणात चिरा खाणीवर गेले होते. आई बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. तिच्यासोबत दुसरी लेक होती. या मुलीला तिने सासरी ठेवले होते. चुलते, चुलत्या असा परिवार आहे. मुलगी अंगणवाडीला जाण्यासाठी तयार झाली होती. ती अंगणात खेळत बागडत असतानाच त्याने डाव साधला. घरी आता नवीन पाहुणा येणार या आनंदात असलेले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.