कार चालकासह गाडी जत पोलीसांनी घेतली ताब्यात
जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत -सांगोला राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी रेवनाळ फाट्याजवळ कार आणि दुचाकीच्या समोरा समोर झालेल्या भीषण अपघतात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली . यातील मयत दोघेही सांगोला तालुक्यातील महीम गावचे असून, अजय लिंगाप्पा कारंडे (वय २३) व प्रशांत दत्तात्रय लोखंडे (वय २४) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा जत पोलीसांत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलीसांनी कार चालक प्रशांत पवार (रा. बारामती जि. पुणे) यास ताब्यात घेतले आहे.
अधिक माहीती अशी, जत सांगोला मार्गावरील रेवनाळ फाट्यावर असणाऱ्या बस थांब्याजवळ शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि कार यांची समोरा समोर जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, दुचाकी चक्काचूर झाली. तर कारच्या ड्रायव्हर साइडचे मोठे नुकसान झाले. या आपघातात मोटर सायकलवरील दोघेही जागीच ठार झाले.
यातील मयत अजय कारंडे व प्रशांत लोखंडे हे त्यांच्या वैयक्तीक कामानिमित्त मोटर सायकल क्रमांक एम. एच. ४५ ए. यु. ३३९३ वरून जत शहरात आले होते. येथील काम आटोपून ते आपल्या महीम या गावाकडे निघाले होते. त्यांची मोटर सायकल रेवनाळ फाट्यावर आली असता, समोरून बारामती कडून येणारी कार क्रमांक एम. एच. ४२ बी. एन. ९९९३ यांच्यात समोरा समोरच भीषण धडक झाली. यात कारमधील एअर बॅग उघडल्याने आतील चार जणांना कांहीही झाले नाही. परंतु कार कांही अंतर रस्त्याच्या बाजूला जावून थांबली. कारमधील प्रवाशी हे लग्न समारंभानिमित्त कर्नाटककडे निघाले होते.
दुचाकी दीडशे फुट परफटत गेली
या अपघातात दोन्ही वाहने वेगात असल्याने समोरच्या कारगाडीने दुचाकीला धडक देताच, दुचाकी तब्बल दीडशे फुट सिमेंट रस्त्यावरून फरफटत गेली. यामुळे दुचाकीस्वार कारंडे व लोखंडे यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर इजा झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती पोलीसांना मिळताच, पोलीसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तर कार चालकासह गाडी पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.