जत

जत तालुक्यातील धावडवाडी परिसरात अपघातांची मालिका सुरूच

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील विजापूर-गुहागर महामार्गावर धावडवाडी निवारा बसस्थानकाजवळ अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी देखील दुपारी 2 वाजता झालेल्या भीषण अपघातात धावडवाडी येथील किरण सुरेश सुतार (वय 28) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नागजहून जतकडे भरधाव वेगाने जाणारी क्रेन निवारा बसस्थानकाजवळ आली असता, दुचाकीवर जात असलेल्या किरणला पाठीमागून जोरदार धडक दिली. डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने किरणचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर क्रेन चालक क्रेन सोडून घटनास्थळावरून फरार झाला. किरणच्या मृतदेहाला जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले, त्यानंतर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जत

तालुक्यातील विजापूर – गुहागर या महामार्गावर असलेल्या धावडवाडी गावाजवळ अलीकडच्या काही दिवसांत सातत्याने अपघात होत आहेत. धावडवाडी गावाच्या रस्त्याला लागून असलेल्या निवारा बसस्थानकाजवळ यापूर्वीदेखील अनेक अपघात झाले आहेत. मागील महिन्यात बकरी ईदच्या दिवशी ट्रकने ठोकरल्याने मुंबई येथे बेस्ट कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. वारंवार होणारे अपघात लक्षात घेता, स्थानिक नागरिकांनी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी छोटे गतीरोधक बसवण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा: डासांपासून होणाऱ्या आजारांपासून सुटका कशी करायची? मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू या 3 आजारांची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या

मात्र, रस्ते विकास प्राधिकरणाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. याकडे दुर्लक्ष होत आहे. धावडवाडी हे ठिकाण विजापूर-गुहागर मार्गावरचा अपघात स्पॉट बनला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शनिवारी झालेल्या अपघाताचा  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांत रात्री उशिरा अपघाताची नोंद झाली. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक जनतेतून केली जात आहे.

हे देखील वाचा: Sangli Crime News : आंबा घाटातील खोल दरीत आढळले 2 तरुणांचे मृतदेह: एक सांगलीचा, तर दुसरा निपाणीचा; आज मृतदेह बाहेर काढणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *