जत

जत तालुक्यात आरोग्य विभागाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त

आयर्विन टाइम्स / जत,(प्रतिनिधी)
शासन राज्यातील आरोग्य विभागाला कोट्यवधींच्या निधीची तरतूद करत आहे; मात्र जत तालुक्यात मंजूर पदाच्या पन्नास टक्केच डॉक्टर, कर्मचारी पदे कार्यरत आहेत. उर्वरित पन्नास टक्के कर्मचाऱ्यांवरून तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत. राज्य शासनाने तत्काळ तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त ९ जागा भराव्यात, अशी मागणी करत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

विक्रमसिंह सावंत आमदार सावंत यांनी गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जत तालुक्यातील ज्वलंत प्रश्न विधिमंडळ पटलावर मांडले. ते म्हणाले, “जत तालुक्यातील सर्वांत शेवटचा मतदारसंघ असून कायमस्वरुपी दुष्काळी आहे. या तालुक्याचा विकास करायचा तर निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासनाच्या जमिनी असून एमआयडीसीची व्यवस्था होऊ शकते. जागा उपलब्ध असून या ठिकाणी पंचतारांकित एमआयडीसी होऊ शकते. येथे एमआयडीसी मंजूर करावी.”

जत तालुक्यात गोंधळी, जोशी, वासुदेव, करंजबाग, लोहार, पारधी, राजपारधी, मरीआईवाले, नाथजोशी, नाथपंथी, बहुरूपी, पाथरवट, गाडीवडर, भामटा, कैकाडी, सनगर, धनगर, बंजारा या विमुक्त जाती व भटक्या जमाती कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. जनता उघड्यावर राहत असून त्यांना कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा मिळत नाहीत. शिक्षण नसल्याने व जुन्या काळातील पुरावे उपलब्ध नसल्यामुळे दाखले काढताना अडचण निर्माण होत आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी.

जत शहरात आदिवासी पारधी समाजासाठी जत शहरात ३०० घरकुलांची योजना राबविण्यात आली होती; परंतु मध्यंतरीच्या काळात जत ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर झाल्यानंतर ना हरकत दाखला मिळण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे बांधकाम खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी १ लाख २० हजार रुपये मिळणारे अनुदान २ लाख ५० रुपये इतके मिळावे.

भाजपचा हस्तक्षेप थांबवा: महाविकास आघाडी सरकार असताना नगरविकास आणि २५ / १५ या योजनेतून मंजूर झालेल्या निधीला स्थगिती मिळाली होती. न्यायालयातून यावरील स्थगिती उठवण्यात आली. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करून या कामात बदल करण्याचा घाट घातला जात आहे. हस्तक्षेपामुळे विकासाभिमुख कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. शासनाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून विकासकामात होणारा बदल थांबवावा, अशी मागणीही आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे.

जतच्या बातम्या
जत तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

आयर्विन टाइम्स
जत,(प्रतिनिधी):
जूनच्या पहिल्या आठवड्यात जत तालुका व उमदी पूर्व भागात दमदार स्वरूपाचा पाऊस झाला. काही परिसरात कमी व काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंदी होऊन रात्रंदिवस पंधरा दिवस पेरणी केली; परंतु ही पेरणी वाया जाण्याची वेळ शेतकऱ्यांना दिसत आहे, कारण पेरणी झाल्यापासून १५ ते २० दिवस झाले पावसामध्ये खंड पडलेला आहे.

पावसाचा खंड पडल्याने शेतकरी झाले चिंताग्रस्त आहेत. उमदी, संख माडग्याळ, मंडळामध्ये दुबार पेरणीचे संकट, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार ते पाच दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र, पेरणी करून दोन आठवडे उलटल्यानंतरही परिसरात पावसाने हजेरी लावली नाही. अनेकदा आकाशात ढग दाटून येतात.

मात्र, पाऊस पडत नसल्यामुळे दुबार पेरणीच्या संकटाची चिन्हे दिसत असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग बियाणे ट्रॅक्टरद्वारे पेरले असल्यामुळे भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा: Farmers beware! dangerous electric shock / धोकादायक विजेचा धक्का रोखण्यासाठी घ्या दक्षता; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 6 सूचना

दानम्मा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजयकुमार पाटील

आयर्विन टाइम्स
जत,(प्रतिनिधी):
जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवस्थान ट्रस्टची सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी ट्रस्टच्या विश्वस्तांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये श्री दानम्मा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजयकुमार पाटील यांची निवड झाली. श्रीक्षेत्र गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवस्थान प्रसिद्ध आहे. यामध्ये कर्नाटकमधील सभासद सर्वाधिक आहेत.

नूतन विश्वस्तांची निवड झाल्यानंतर श्री दानम्मा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजयकुमार पाटील यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी चंद्रशेखर गोबी यांची निवड करण्यात आली. खजिनदार म्हणून चंद्रशेखर इंडी यांची निवड झाली. या सर्व निवडी बिनविरोध झाल्या. या वेळी विश्वस्त सदाशिव गुड्डोडगी, मल्लिकार्जुन पुजारी, धनाप्पा पुजारी, सागर चंपनावर, गजेंद्र कुल्लोळी आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा: नवी मालिका: ‘तू भेटशी नव्याने’; 8 जुलैपासून सोनी मराठीवर; एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ येथे आरोग्य शिबीर

आयर्विन टाइम्स
जत,(प्रतिनिधी):
जत तालुक्यातील उमदी येथे ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ येथे लायन्स क्लब उमदी व सांगली प्राइड यांच्या वतीने, आरोग्य तपासणी, औषध उपचार शिबिर पार पडले. उमदी येथील लायन्स क्लबचे डॉ. रवींद्र हत्तळी, डॉ. मल्लिकार्जुन म्हेत्री, डॉ. हळदकी, गुरुकृपा पॅथॉलॉजीचे अमृत सातपुते व सचिन मेत्रे, सचिन वालेकर, बसवराज साबणे या सर्वांनी शाळेत उपस्थित राहून पहिली ते पाचवीच्या वर्गातील १४० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून वजन, उंची व ऑक्सिजनची तपासणी करण्यात आली. औषध उपचार करण्यात आले. तसेच डॉ. मल्लिकार्जुन म्हेत्रे यांनी विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे.

तो नेहमी निरोगी असला पाहिजे. पाणी व आरोग्याचे महत्त्व सांगितले. तसेच सर्व डॉक्टर व शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खांडेकर, भीमाशंकर कंबार, गणेश जाधव यांनी सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. येथून पुढच्या काळात शाळेला मदत करणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमाशंकर कंबार यांनी केले व आभार प्रदर्शन गणेश जाधव यांनी केले. डॉक्टर्स डे निमित्त लायन्स क्लब यांच्याकडून कार्यक्रम घेण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !