सारांश: आंबेगाव तालुक्यातील रोडे कुटुंबाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी नऊ पानांची विशेष लग्नपत्रिका तयार केली आहे. या पत्रिकेत तब्बल १५६६ लोकांची नावे नमूद करण्यात आली आहेत. नातेवाईक, मित्र, राजकारणी, अधिकारी अशा सर्वांचा यात समावेश आहे. प्रत्येक नात्याला मान देण्यासाठी केलेली ही कल्पना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पुणे, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
“तुमचं नाव आमच्या पत्रिकेत नाही का?” – या एका वाक्यामुळे लग्नात किती तरी नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. पण आंबेगाव तालुक्यातील रोडे कुटुंबाने याला भन्नाट उत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी तयार केलेली नऊ पानांची पत्रिका सध्या गावात नव्हे, तर जिल्हाभर गाजते आहे. कारण त्यात आहेत तब्बल एक हजार पाचशे सहा-सष्ठ (१५६६) मान्यवरांची नावं!
लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील मनोजकुमार कोंडिबा रोडे पाटील यांच्या कन्या नीलिमा हिचा विवाह खडकवाडीचे अक्षय बबनराव सुक्रे यांच्यासोबत होतोय. पारंपरिक लग्नपत्रिकेच्या चौकटी मोडीत काढत, त्यांनी ही एक आगळीवेगळी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
नातेवाईक, मित्रमंडळी, गावकरी, शिक्षक, वकील, डॉक्टर, पत्रकार, कीर्तनकार, पोलिस, उद्योजक, सरपंच, आमदार-सांसद – असा कोणताही घटक वगळलेला नाही. ज्यांनी कधी ना कधी कुटुंबावर उपकार केले, प्रेम दिलं, आधार दिला, त्या सर्वांची नावं यात समाविष्ट आहेत.
यादी पाहूनच लोक म्हणतायत, “या लग्नाला यायलाच लागतंय!” कारण नाव पत्रिकेत असेल, तर कोणीही गैरहजर राहणार नाही, हीच तर कल्पनेमागची संकल्पना आहे.
रोडे कुटुंबाने नातेसंबंधांची जपणूक करत, एक समाजाभिमुख संदेश दिला आहे – “प्रत्येक नातं महत्त्वाचं असतं, आणि प्रत्येकाला मान द्यायला हवा.”
सध्या ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक लग्नसराईतल्या मंडळींना यामधून प्रेरणा मिळत आहे.
तुमचं नाव आहे का या पत्रिकेत? नसेल, तर पुढचं लग्न अजिबात चुकवू नका – कारण तुम्हालाही यायलाच लागतंय!