इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाची धडाकेबाज कारवाई
इस्लामपूर, (आयर्विन टाइम्स):
इस्लामपूर परिसरात मंदिर आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांत असुरक्षिततेची भावना वाढली होती. परंतु पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आता हा चोरटा गजाआड झाला आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईत, चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, चोरीस गेलेल्या १२,७३,४०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपशील
गुन्हा दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी रेठरेहरणाक्ष गावात घडला. राणी हणमंत कोळेकर (वय ४० वर्षे, रा. रेठरेहरणाक्ष) जत्रेला गेल्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी झाली. या घटनेत सुमारे ७१,००० रुपये चोरीस गेले.
आरोपीचा शोध आणि अटक
इस्लामपूर पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यात संशयित इसम राहुल प्रकाश माने (वय ३२ वर्षे, रा. जावडेकर चौक, इस्लामपूर) याचा सहभाग असल्याचे उघड झाले. संशयिताला शाहूनगर येथील विजय हॉल परिसरातून ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ चोरीची रक्कम २०,६०० रुपये सापडली.
आरोपीची कबुली आणि हस्तगत मुद्देमाल
राहुल माने याने इस्लामपूर आणि कडेगाव तसेच चिंचणी-वांगी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १२,७३,४०० रुपयांचा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, १५ तोळे सोन्याचे आणि ५०० ग्रॅम चांदीचे दागिने आहेत.
हस्तगत मुद्देमाल
1. रोख रक्कम:२०,६०० रुपये.
2. सोन्याचे दागिने: गंठण, तुशी, कानातील टॉप्स, मंगळसूत्र, चैन, अंगठ्या इत्यादी.
3. चांदीचे दागिने: ब्रासलेट, पैजण, जोडवी आणि छल्ला.
4. वाहन: स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १० एयु ४४२८) जप्त.
पोलिसांची पुढील कार्यवाही
पोलिसांनी तपास अधिक गतीने चालू ठेवला असून, आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक संदेश यादव करीत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांचे योगदान
इस्लामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी संदीप घुगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय हारुगडे व त्यांच्या पथकाने हे यश मिळवले.