तिन्ही सुरक्षा दलांचा रात्रंदिवस पाहारा
दोस्तांनो, आपण सर्वांनी नुकताचा आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आज आपण सगळे स्वतंत्र भारतात राहतो. हेच स्वातंत्र्य कायम अबाधित राहावे, त्याच्यावर कोणत्याही शत्रूने आक्रमण करू नये यासाठी आपले जवान सीमेवर तैनात आहेत. आपले लष्कर, नौदल आणि हवाई दल ही तिन्ही सुरक्षा दले सदैव सज्ज असतात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण या दलांबाबत जाणून घेऊया! पायदळ, नौदल आणि हवाई दल ही तिन्ही सुरक्षा दले अनुक्रमे जमिनीवर, समुद्र क्षेत्र आणि हवाई क्षेत्रावर रात्रंदिवस पाहारा देत आहेत, म्हणूनच आपण निर्धास्त झोपू शकतो.
४ डिसेंबर दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा
सुरक्षा दलांपैकी एक दल म्हणजे नौदल. याची स्थापना १९३४ मध्ये झाली. या नौदलाचे प्रमुख आहेत अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी. या दलाचे ब्रीदवाक्य आहे ‘शं नो वरुण’.
१९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. तो दिवस ४ डिसेंबर होता. त्यामुळे हा दिवस नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे.नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग यांसारखी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स आणि सी हॅरियर्ससारख्या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
आय.एन.एस. विराट, डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका, तसेच संकुश पाणबुडी आहे. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतचादेखील समावेश आहे. १९६६ मध्ये लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. आजतगायत ८० हून अधिक युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. सुरक्षा दलातील नौदलातील सैनिकांची संख्या पुढीलप्रमाणे : ५६००० खलाशी, २०० मरिन कमांडो, १५५ युद्धनौकांच्या तोफा
सुरक्षा दलातील महत्त्वाचे दल म्हणजे लष्कर
भारताच्या सुरक्षा दलातील महत्त्वाचे दल म्हणजे लष्कर (पायदळ). याची स्थापना : १५ ऑगस्ट १९४७ रोजी करण्यात आली. आता या विभागाचे प्रमुख आहेत जनरल मनोज मुकुंद नरवणे. सुरक्षा दलातील लष्कराचे ब्रीदवाक्य आहे सेवा परमो धर्मः।
भारतीय लष्करातील पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनांचा एक महत्त्वाचा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सर्वोच्च सेनापती आहेत, तर लष्करप्रमुख लष्कराच्या सर्व कामकाजाचे नेतृत्व करतात.
भारतीय लष्करात विविध रेजिमेंट्स असल्या तरीही, भौगोलिक आणि व्यावहारिकदृष्ट्या लष्कराच्या सात कमांड्स आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तान, चीन यांसारख्या शेजारील देशांसोबत केलेल्या युद्धांप्रमाणेच ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत यांसारख्या अंतर्गत मोहिमाही आखल्या आहेत.
सैनिकांची संख्या: १३,२५,००० नियमित, ११,५५,००० राखीव
हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलांतील एक
हवाई दल हेदेखील आपल्या सुरक्षा दलातील महत्त्वाचे दल आहे. याची स्थापना: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी झाली. या दलाचे सध्याचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी या विभागाचे ब्रीदवाक्य आहे नभःस्पृशं दीप्तम्. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलांतील एक मानले जाते. आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणकीय प्रणाली हवाई दलाकडे आहे.
हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. रशिया, फ्रेंच बनावटीबरोबरच आता स्वदेशी बनावटीची लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचा समावेशही भारतीय हवाई दलात करण्यात आला आहे. सुखोई- ३०, मिराज- २०००, मिग-२९, मिग-२१, तेजस अशी अनेक लढाऊ विमाने आपल्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. या दलातील सैनिकांची संख्या आहे १,७०,००० जवान
ज्यांना भारतीय सुरक्षा सेवेत जायचे आहे त्यांनी हे आवर्जून करा….
मित्र-मैत्रिणींनो, तुम्हालाही आपल्या जवानांप्रमाणे देशाची सेवा करावी, सेनेत भरती व्हावे असे वाटत असेल, तर आतापासूनच त्या दृष्टीने तयारी करा. नाशिकची भोसला मिलिटरी स्कूल, पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकादमी (एनडीए) अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करा. शालेय अभ्यास आणि व्यायाम मन लावून करा. अवांतर वाचन करा. देशावर प्रेम करा आणि देशातील सर्व घटकांचा आदर करा. असे केल्यास तुम्हीही नक्कीच व्हाल शूर जवान आणि मोठ्या गर्वाने म्हणू शकाल, ‘जय हिंद !