मुंबईबरोबरच राज्यभर वडापाव लोकप्रिय
मुंबई,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
जगभरातील खाद्यपदार्थांचा अभ्यास करणाऱ्या प्रसिद्ध खाद्य आणि प्रवास मार्गदर्शक टेस्ट अॅटलसच्या “वर्ल्ड फूड अवॉर्ड्स २०२४-२५” यादीत मुंबईच्या वडापावने पाचवा क्रमांक पटकावला आहे. ही यादी जागतिक खाद्यपदार्थांच्या वैविध्यतेला आणि शहरांच्या खास पाककृतींना मान्यता देते. यामध्ये १०० शहरांतील खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला असून, पहिल्या दहामध्ये नॅपल्स, मिलान, बोलोगना, फ्लोरन्स, मुंबई, रोम, पॅरिस, व्हियना, तुरीन आणि ओसाका या शहरांचा समावेश आहे.
युरोपियन शहरांचे वर्चस्व
सर्वोत्तम जागतिक खाद्य शहरांच्या यादीत युरोपियन शहरांचे वर्चस्व दिसून येते. पहिल्या दहामध्ये आठ युरोपियन शहरे असून, इटलीच्या शहरांनी यात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. इटालियन खाद्यपदार्थांनीही उत्कृष्ट प्रदर्शन केले असून, पिझ्झा नेपोलेताना जागतिक स्तरावर दुसरी सर्वोत्तम डिश ठरली आहे. याशिवाय पिझ्झा मजेरेटा, रिसोटो आला मिलानसे, तागलीआटले अल रागू, बिस्तेक्का अल्ला फ्लोरेंटीना हे इटालियन पदार्थ टॉप यादीत आहेत.
मुंबईचा वडापाव: स्वस्त अन् मस्त स्ट्रीटफूड
वडापाव हे मुंबईतील खवय्यांचे आवडते स्ट्रीटफूड असून, त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. स्वस्त, चविष्ट आणि पटकन मिळणारा हा खाद्यपदार्थ आज मुंबईतील ओळख बनला आहे. वडापावचा साधेपणा आणि त्यामध्ये मिसळलेली चव ही जगभरातील खाद्यपदार्थांच्या यादीत पाचवा क्रमांक मिळवण्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. वडापाव हा एक सार्वत्रिक खाद्यपदार्थ असून, त्याने जगभरातील खाद्यप्रेमींच्या हृदयात स्थान मिळवले आहे.
भारताची खाद्यपरंपरा जागतिक स्तरावर
भारतीय खाद्यपदार्थांच्या वैविध्यपूर्ण पाककृतींना जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे. वडापावसह भारतातील मसालेदार आणि स्वादिष्ट पदार्थ २०२४-२५ साठी टेस्ट अॅटलसच्या क्रमवारीत १२ व्या स्थानावर आहेत. मुंबईने टॉप १० खाद्य शहरांमध्ये स्थान मिळवले आहे, तर राजधानी दिल्ली ४५ व्या स्थानावर आहे. भारतातील प्रदेशांमध्ये पंजाब सातव्या क्रमांकावर असून, अमृतसरी कुलचा, तंदुरी मुर्ग आणि शाही पनीरसारख्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र ४१व्या, पश्चिम भारत ५४व्या आणि दक्षिण भारत ५९व्या स्थानावर आहेत.
ग्लोबल फूड सीनमध्ये भारताचे स्थान
टेस्ट अॅटलसने जागतिक खाद्यपदार्थांच्या रँकिंगमध्ये भारताचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जपानमधील ओसाका ‘किचन ऑफ द नेशन’ म्हणून टॉप १० मध्ये असताना, मुंबईच्या वडापावने भारतीय खाद्यसंस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. वडापावच्या या यशामुळे भारतीय स्ट्रीटफूडच्या चवीला जागतिक मान्यता मिळाल्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटतो.
सर्वोत्तम खाद्यपदार्थांची यादी:
पिझ्झा मजेरेटा – इटली
रिसोटो आला मिलानसे – इटली
तागलीआटले अल रागू – इटली
बिस्तेक्का अल्ला फ्लोरेंटीना – इटली
वडापाव – भारत
स्पागेट्टी अल्ला कार्बनारा – इटली
क्रेमे बुली – फ्रान्स
झिवीब्रेल रोस्टब्रटेन – ऑस्ट्रिया
अगनोलोट्टी – इटली
टोकोयाकी – जपान
वडापावसाठी हे जागतिक स्तरावरील यश एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे. स्वस्त, मस्त आणि जगभरातील लोकांना मोहवणारा वडापाव आता केवळ मुंबईचा नाही, तर जागतिक खाद्यप्रेमींचाही आवडता पदार्थ बनला आहे.