सांगली जिल्ह्यात पाऊस लांबल्याने खरीप पेरण्या अडचणीत
आयर्विन टाइम्स / सांगली
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. आत्तापर्यंत या हंगामातील दोन लाख ५५ हजार हेक्टर पैकी सरासरी एक लाख ५० हजारावर हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर तीन लाख एकर क्षेत्र अध्यापही नापरेच आहे. पावसाने अचानक ओढ दिल्याने पिके उनं धरू लागली आहेत. खडकाळ भागातील पिकांची वाढ खुंटली आहे. खरीपासाठी अध्यापही पेरणीचा कालावधी आहे. दमदार पाऊस झाला तरच यंदाच्या हंगामातील खरीप चांगला साधणार आहे. पाऊस लांबल्यास खरीप पेरणी अडचणीत येणार असून काही क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट येण्याची भिती व्यक्त केली जात असून यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.
सांगली जिल्ह्यात खरिपाचे किती क्षेत्र आहे जाणून घ्या
मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार सुरूवात केली. दुष्काळी जतेसह आटपाडी, कवठेमहांकाळ आदी तालुक्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याने खरीप पेरणीला वेळेवर सुरूवात झाली. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करून शेत पेरणीसाठी तयार ठेवली होती. दमदार पाऊस झाल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरूवात केली. जिल्ह्यात खरीपाचे सुमारे दोन लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. या हंगामात बाजरी, उडीद, भूईमुग, तुर, मका, आदी पेरणी केली जात आहे.
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टरवर पेरण्या
कृषी विभागाच्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात खरिपाच्या आत्तापर्यंत दीड लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक पेरणीला ब्रेक लागला आहे. काही भागात रिमझीम पाऊस पडत असला तरी मात्र ढगाळ वातावरण वारे आणि कडक उन्हामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिके उन्हें धरू लागली आहेत. खडकाळ भागातील पिकांची मोड सुकू लागली असुन वाढही खुंटली आहे. आठवड्याभरात दमदार पाऊस न पडल्यास दुबार पेरणीची वेळ येण्याची भिती निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा: Jat Crime: खून करून पसार झालेल्या आरोपीस जेरबंद करण्यात उमदी पोलीसांना यश; खंडनाळ येथील 40 वर्षीय महिलेचा खून आर्थिक व्यवहारातून
तीन लाख एकर अध्यापही नापरेच जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रावर शंभर टक्के पेरणीचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. तसे नियोजन केले आहे. पुरेशा प्रमाणात खते, बियाणांची मागणी केली असून त्या प्रमाणात पुरवठाही झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. तालुकानिहाय पडलेला पाऊस मिमी मिरज : २३९, जत : २३३, खानापूर २७९, वाळवा : २९९, शिराळा : ३७५, आटपाडी २१५, कवठेमहकांळ : २९०, पलूस : २२२, कडेगाव : २४६.
एकूण क्षेत्राच्या निम्या क्षेत्रावर पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने मोठा ब्रेक घेतला, यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर कमी कालावधीची पिके घ्यावी लागणार जिल्ह्यात या हंगामासाठी दोन लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील आतापर्यंत दीड लाखांवर क्षेत्रावर पेरणी झाली असून हंगामानुसार जुलै अखेर पर्यंत खरीप पेरणी करता येते. ऑगस्ट नंतर पेरणी केल्यास ती पुढील रब्बी हंगामासाठी अडचणीची ठरणार असल्याने त्यानंतर मात्र पेरणी करायची झाल्यास कमी कालावधीची पिके घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे ब्रेक घेतलेल्या पावसाने लवकरात लवकर परतण्याची गरज आहे.
खरिपाच्या सर्वाधिक पेरण्या जत तालुक्यात
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तालुकावार आत्तापर्यंत झालेली पेरणी हेक्टरमध्ये: तालुका आणि पेरणीक्षेत्र: मिरज २०००, जत ६६५७०, वाळवा १५७८०, खानापूर ५७००, तासगाव १२००, शिराळा १५०४०, आटपाडी ५६८९, कवठेमहकांळ ८९४५ पलूस १२५१, कडेगाव ७३५०
मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला
सांगली जिल्ह्यात जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला आहे. जून महिन्यात १२६५ दशलक्ष घनफूट म्हणजे १६ टक्के पाणीसाठा होता. एका महिन्यात ८३ प्रकल्पांत एकूण ४११२ दशलक्ष पाणीसाठा झाला आहे. त्यापैकी उपयुक्त २९२० दशलक्ष घनफूट म्हणजे ३७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पानमध्ये १६ टक्के एवढा उपयुक्त पाणी साठा
आठवड्यात जिल्ह्यात ५ मध्यम व ७८ लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची साठवण क्षमता ९४४० दशलक्ष घनफूट इतकी आहे. जूनच्या पहिल्या या प्रकल्पांत २३५९ दशलक्ष पाणीसाठा आहे. त्यापैकी १२६५ दशलक्ष घनफूट म्हणजे १६ टक्के एवढा उपयुक्त पाणी साठा होता. जून महिन्यात सर्वसाधारण १२९ मिलिमीटर इतका पाऊस होतो. जून महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. तर काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.
या काळात २२६ मिलिमीटर म्हणजे १७५ टक्के पाऊस पडला. त्यामुळे मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात १६ टक्के पाणीसाठा उपयुक्त होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पात एकूण पाणीसाठा ४११२ दशलक्ष घनफूट म्हणजे ३६ टक्के झाला आहे.