बाज

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाज (ता. जत) येथील शाखेत तब्बल ३० लाख रुपयांचा निधी अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित अपहार शाखाधिकारी आणि लिपिकाने मिळून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून, मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बाज

ही घटना २०१७ मध्ये घडलेली असून, तब्बल आठ वर्षांनी बँकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणात उघड झाली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानातील निधी संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या खात्यांमध्ये वळवून गैरवापर केल्याचे समजते.

दरम्यान, संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर बँकेच्या मुख्यालयातून विशेष तपास पथक बाज शाखेत दाखल झाले आहे. यासोबतच डफळापूर शाखेचीही तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अपहाराची एकूण रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा: जनुकीय अभियांत्रिकी: भविष्याचे वरदान की विनाशाचे शस्त्र? विज्ञानाच्या नकाशावर झळकणारी एक महत्त्वाची पण वादग्रस्त क्रांती; A boon for the future or a weapon of destruction?

विशेष म्हणजे, अपहार प्रकरणात संशयित शाखाधिकारी सोलनकर हे पूर्वीही वादग्रस्त राहिले आहेत. शिपाई म्हणून नोकरीला सुरुवात करून ते शाखाधिकारी पदापर्यंत पोहोचले होते. यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांना न जुमानता त्यांनी गोवा दौरा केला होता. त्या प्रकरणातही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती.

जिल्हा बँकेमध्ये त्रयस्त यंत्रणेकडून लेखापरीक्षण, अंतर्गत तपासणी आणि शासनाच्या विविध पातळ्यांवरून चौकशी केली जात असूनही इतक्या मोठ्या रकमेचा अपहार कसा काय झाला, असा सवाल निर्माण झाला आहे.

“बाज शाखेत झालेल्या अपहाराची चौकशी सुरू आहे. अंतिम तपासणीनंतर अपहाराची निश्चित रक्कम समोर येईल, त्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”
– शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *