सांगली परिसरात शस्त्रांचा धाक दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न
आयर्विन टाइम्स / सांगली
सांगलीतील संजयनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळक्याने मंगळवार रात्री बाराच्या सुमारास अक्षरशः धुमाकूळ घातला. आपसांत झालेल्या वादातूनच मध्यरात्री दुचाकी पेटवून देण्यात आली. तसेच शस्त्रांचा धाक दाखवत परिसरात दहशत माजवण्यात आली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी तातडीने या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की एक रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याचे टोळक्याचा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे. काल रात्री त्या टोळक्याने परप्रांतीय तरुणांना अडवले. त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करण्यात आली. त्यानंतर ते टोळके पुन्हा परिसरात फिरू लागले. धुंद असणाऱ्या हा टोळक्यातील दोघांचा एकमेकांशी किरकोळ कारणातून वाद झाला. यातून दुचाकी जाळून टाकू, असा दम देण्यात आला. त्यातूनच मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चक्क दुचाकीच
पेटवून देण्यात आली. बघता बघता दुचाकीचा चक्काचूर झाला.
परिसरातील नागरिकांनी हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला. त्यानंतर काही वेळात संजयनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई केली. परंतु रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली नव्हती. जळालेली दुचाकी पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या टोळक्याचा परिसरात धुमाकूळ सुरू आहे. रात्रीच्या वेळी लूटमार करणारी या टोळीचा तातडीने बंदोबस्त व्हावा, अशी मागणी नागरिकांची आहे. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सांगलीत कृषी कंपनीस २३ लाखांचा गंडा: धनादेशाद्वारे काढली रक्कम ; दोन कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर गुन्हा
सांगली येथील ऑरबीट क्रॉप मायक्रोन्युट्रीयंट्स या कृषी कंपनीस तब्बल २३ लाख २५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. धनादेशाद्वारे पाच वर्षांत ही रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीतील दोघा कर्मचाऱ्यांसह युनियन बँकेच्या दोघा अधिकाऱ्यांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी कंपनीतील कर्मचारी उत्तम महावीर अडसूळ (वय ३७), भाग्यश्री उत्तम अडसूळ (३३, दोघे झील इंटरनॅशनल स्कूलनजीक, कुपवाड), युनियन बँकेचे रविराज मुरग्याप्पा पळसे (४२, दत्तनगर, कर्नाळ रस्ता, जॅकवेल रस्ता, सांगली) आणि विवेक रंजन ( ४९, श्रीराम संकुल, एस. टी. कॉलनी रस्ता, विश्रामबाग, सांगली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कंपनीचे संचालक दीपक प्रकाश राजमाने यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले, की शहरातील विजयनगर परिसरात मागील काही वर्षांपासून ऑरबीट कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यात मुख्य लेखापाल म्हणून उत्तम अडसूळ व सह लेखाकार भाग्यश्री अडसूळ कार्यरत होते. आर्थिक सर्व व्यवहार हे दोघेच सांभाळत होते. दरम्यान, त्यांची युनियन बँकेचे रविराज पळसे व मार्केट यार्ड येथील शाखाधिकारी विवेक रंजन यांच्याशी ओळख झाली होती. चौघा संशयितांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहारचा कट रचला. कंपनीच्या देखभालीसाठी व कर्मचाऱ्यांच्या पगार करण्यासाठी फिर्यादी राजमाने यांनी कोरे धनादेश लेखापालाच्या ताब्यात दिले होते.
धनादेशावर परस्पर रक्कम टाकून ते पैसे काढण्यात येत होते. हा प्रकार सन २०१८ पासून सुरू होता. कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी वसूल केलेली रक्कम संशयित कंपनीच्या खात्यावर टाकणे बंधनकारक असताना संशयित उत्तम अडसूळ हा ती रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.