सांगली जिल्ह्यातील मळणगाव व बेळगाव येथे अत्याचार
आयर्विन टाइम्स / सांगली
पंचवीस वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. तिला जबरदस्तीने चारचाकीतून नेऊन सांगली जिल्ह्यातील मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) व बेळगाव येथे अत्याचार करण्यात आला. धमकीही देण्यात आली. दोघांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशाल दगडू मंडले (नागेवाडी) याच्यासह एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीचा चालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
संशयित विशाल दगडू मंडले याने जबरदस्तीने महिलेच्या घरासमोरून तिला गाडीतून नेले. वारंवार बलात्कार केला. २८ जुलै ते ४ सप्टेंबरदरम्यान प्रकार घडला. पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित महिलेने गुरुवारी फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील एका गावातील महिलेला संशयित विशाल मंडले याने जबरदस्तीने तिच्या घरासमोरून गाडीतून नेले. त्या महिलेवर मळणगाव (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली ) तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे वारंवार बलात्कार केला.
शिवाय तिचा पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ‘तू इथून निघून गेलीस, तर तुझे तुकडे तुकडे करीन’ अशीही धमकी दिली. याप्रकरणी संबंधित पीडित विवाहितेने विशाल मंडले याच्यासह अन्य एका विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांनी त्या गावात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे हे करीत आहेत.
दरम्यान, संबंधित पीडित विवाहितेवर २८ जुलै २०२४ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मळणगाव तसेच बेळगाव याठिकाणी बलात्कार करण्यात आला. संशयित विशाल मंडले याने हे कृत्य केले. विशालच्या या कृत्यात एका चारचाकी गाडीच्या चालकाचाही समावेश आहे. त्यालाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. मात्र ही पांढऱ्या रंगाची ही चारचाकी गाडी नेमकी कोणाची आहे. या गाडीवर चालक म्हणून कोण होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
मिरज तालुक्यातील भोसेत शेतकऱ्यासह दोघांची आत्महत्या
भोसे (ता. मिरज जि. सांगली ) येथे शेतकऱ्यासह दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकाने राहत्या घरात तर दुसऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीश राजाराम वडर (वय ४१, वडर गल्ली, भोसे) व धोंडीराम अण्णाप्पा सुतार (वय ५८) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात वेगवेगळ्या घटनांबाबत नोंद आहे. आत्महत्या केल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोसे गावातील वडर गल्ली येथे राहण्यास असलेल्या सतीश वडर यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील भोसे गावातीलच एका शेतामध्ये धोंडीराम अण्णाप्पा सुतार या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. शेतात काम करणाऱ्या मजुरांना सदर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. भोसे गावात एकाच वेळी शेतकऱ्यासह दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मिरज ग्रामीण पोलिसात नोंद असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
तलाठी भरतीसाठी तिघांची अठरा लाखांची फसवणूक; सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळच्या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
महसूल विभागात तलाठी भरती करतो म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील एका महिलेसह अन्य दोन परीक्षार्थीची १८ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
विकास बापू पाटील (कुकटोळी ), प्रवीण गुंडा होनराव (कवठेमहांकाळ) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. धनश्री मंगेश पाटील (वय २७, दिघी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली. विकास पाटील यांनी महसूल विभागातील तलाठी म्हणून भरती करतो, असे सांगत नऊ लाख रुपये तर आणखी दोघांकडून नऊ लाख असे १८ लाख रुपये घेतलेत. हे पैसे तिघांनी एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत विकास पाटील व प्रवीण होनराव यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरलेत.
परीक्षेच्या कालावधीनंतर त्यांना नियुक्तीसंदर्भात वारंवार विचारणा केली. मात्र त्यांनी निवड झाल्याबाबत बनावट दस्ताऐवज व नकली मोहर (शिक्का) असलेले नियुक्तीपत्र पाठवले. त्यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर अजूनही नियुक्ती होत नाही हे दिसल्यावर त्यांना नियुक्ती करून द्या, असा तगादा लावला.
त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पैशाची मागणी केली असता त्यांनी आम्हाला पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समजले असे धनश्री पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. विकास पाटील व प्रवीण होनराव यांच्याविरोधात पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक विनायक मसाळे तपास करीत आहेत.