सांगलीजवळ माधवनगर येथे कारवाई
आयर्विन टाइम्स / सांगली
विना परवाना देशी बनावटीची पिस्टल आणि ४०० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी जत तालुक्यातील डफळापूर येथील श्रीकांत पाटोळे याला सांगलीजवळील माधवनगर येथे पोलिसांनी अटक केली. दि. २५ सप्टेंबर रोजी संजयनगर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी आर्म अॅक्ट अंतर्गत या आरोपीला अटक केली. माधवनगर येथील विश्वभारती हॉटेल अॅन्ड बारच्या समोर पोलिसांनी ही कारवाई केली.
फिर्यादी पोहेकॉ दिपक प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अक्षय श्रीकांत पाटोळे (वय २४ वर्षे, हा डफळापुर, जत, सांगली) येथील रहिवासी आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोहेकॉ कपील सांळुखे यांना संशयित इसमाबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप घुगे, रितु खोखर, विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने त्वरित कारवाई केली.
२५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.१० वाजता, माधवनगर येथील विश्वभारती हॉटेल अॅन्ड बार समोर संशयित अक्षय पाटोळे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासणीत ५०,००० रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्टल आणि ४०० रुपये किमतीच्या दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
अक्षय पाटोळे याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता, आणि तो पिस्टल आणि काडतुसे कोठून आणली याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला २२.४० वाजता अटक करण्यात आली आहे.
आरोपीच्या इतर गुन्ह्यांची चौकशी सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सय्यद करत आहेत.