नेवरी गावात एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता जुगार
आयर्विन टाइम्स / कडेगाव
कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेवरी गावात, एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलीसांनी मोठी कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या अड्ड्यावर छापा मारून एकूण ११ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काय आहे घटनाक्रम?
१३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास, विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, नेवरी गावातील राहुल महाडिक यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ या ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात सहा आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये अक्षय धुमाळ (२२ वर्षे, विटा ), प्रशांत घोरपडे (२६ वर्षे,विटा), साईराज बोडरे (३४ वर्षे, विटा ), अमित भिंगारदिवे (२४ वर्षे, विटा), बिरजु पंडित (२९ वर्षे,विटा), आणि नाथा गुरव (४० वर्षे, कडेगाव ) यांचा समावेश आहे. आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी वापरलेले ५४,००० रुपये रोख, पत्त्याचा कॅट आणि बॉलपेन जप्त करण्यात आले.
जप्त मुद्देमाल
पोलीसांनी या छाप्यात एकूण ११.१४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ५४,००० रुपये रोख रक्कम, ६ मोटरसायकली आणि १ टाटा हेक्सा चारचाकी वाहनाचा समावेश आहे.
१. होंडा शाईन मोटरसायकल (MH.10.BT.2163)
२. बजाज सीटी १०० मोटरसायकल (MH.10.A.B.6237)
३. बजाज सीटी १०० मोटरसायकल (MH.10.D.H.3560)
४. हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (MH.10.CC.6432)
५. होंडा शाईन मोटरसायकल (KA.25.ES.3679)
६. होंडा स्प्लेंडर प्रो (MH.10.BP.5827)
७. टाटा हेक्सा चारचाकी (MH.11.CG.9969)
पुढील तपास सुरू
या प्रकरणात कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आशिष जाधव आणि पोलीस नाईक श्रीकांत कुंभार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.