सारांश: हरियाणाच्या गुरूग्राममध्ये दहावीच्या विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून तिच्या आजीच्या खात्यातून ८० लाख रुपये लंपास करण्यात आले. आरोपींनी सोशल मीडियाद्वारे तिचे मॉर्फ केलेले फोटो वापरून धमकी दिली आणि पैसे उकळले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून मुख्य आरोपीला अटक केली. आतापर्यंत ५.१३ लाख रुपये वसूल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुरुग्राम (ट्रेंडिंग न्यूज):
सोशल मीडियाचा गैरवापर करून एका दहावीच्या विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करत तब्बल ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २० वर्षीय सुमित कटारिया आणि त्याच्या साथीदारांनी तिचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी सोमवारी (दि. ३) मुख्य आरोपी नवीन कुमारला अटक केली असून, ८० लाखांपैकी ५ लाख १३ हजार रुपये पोलिसांनी वसूल केले आहेत.
फसवणुकीचा मास्टर प्लॅन
पीडित विद्यार्थिनीने एका मित्राकडे आपल्या आजीच्या बँक खात्यात मोठी रक्कम असल्याची माहिती शेअर केली होती. ही माहिती संपूर्ण शाळेत पसरली आणि ती २० वर्षीय सुमित कटारिया आणि त्याच्या मित्रांपर्यंत पोहोचली. त्यांनी पीडितेच्या आजीच्या पैशांवर डोळा ठेवण्यास सुरुवात केली.
सुमितने आधी सोशल मीडियावर पीडितेची मैत्री केली आणि तिचे फोटो व व्हिडिओ मिळवले. त्यानंतर हे फोटो मॉर्फ करून तिला धमकावले. “तुझे हे फोटो व्हायरल करू,” असे सांगत त्याने पैशांची मागणी केली.
दबावाखाली विद्यार्थिनीकडून पैसे हस्तांतरित
मॉर्फ केलेल्या फोटोंच्या भीतीने विद्यार्थिनीने आपल्या आजीच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली. आजीला ऑनलाइन बँकिंगची माहिती नसल्याने तिला काहीच कल्पना नव्हती. महिनोमहिने सुरू असलेल्या या प्रकरणात ८० लाख रुपये आरोपींच्या खात्यावर जमा झाले.
फसवणुकीचा पर्दाफाश
पीडितेच्या मैत्रिणीने ही घटना तिच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गंभीर स्वरूपाच्या सायबर गुन्ह्याचा तपास सुरू करून मुख्य आरोपी नवीन कुमारला अटक केली.
पोलिसांची पुढील कारवाई
– मुख्य आरोपी नवीन कुमारला गुरुग्राममधून अटक
– पोलिसांनी ५ लाख १३ हजार रुपये जप्त
– इतर आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू
ही घटना सोशल मीडियाच्या अतिवापराचे आणि सायबर सुरक्षेच्या अभावाचे गंभीर उदाहरण आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या डिजिटल वर्तनावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.