कुरळप पोलिसांत जनावरांच्या शेडमधून म्हैशी चोरीला गेल्याची तक्रार
आयर्विन टाइम्स / इस्लामपूर
सांगली जिल्ह्यातील कुरळप (ता. वाळवा) येथील कुरळप पोलीसांनी म्हैस चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक करून 4.62 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन म्हैस, रोख रक्कम, आणि दोन वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
सदर प्रकरणी फिर्यादी प्रकाश तुकाराम फारणे (रा. ठाणापुढे) आणि हनमंत सर्जेराव पाटील (रा. कार्वे) यांनी आपले जनावरांचे शेडमधून म्हैस चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. चोरीची घटना 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली होती.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
अटक आरोपींची नावे तेजस बाबुराव कदम (वय 28, रा. शिये माळवाडी, ता. हातकलंगले, जि. कोल्हापूर) आणि बाबासो आनंदा कांबळे (वय 44, रा. कार्वे, ता. वाळवा, जि. सांगली) अशी आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या दोन म्हैस, रोख रक्कम, आणि चोरीसाठी वापरलेली वाहने जप्त करण्यात आली.
आरोपींना अटक करून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी सदर प्रकरणाच्या तपासात यश मिळवले आहे.