गौरंगच्या शेजारील सीटवर येऊन जेव्हा अजय बसला, तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. शिक्षकांनी जेव्हा याचे कारण विचारले, तेव्हा गौरंगने एक फार विचित्र कारण सांगितले. त्यामुळे शिक्षकांना अजयला समजवावे लागले. असं काय झालं होतं, ज्यामुळे गौरंग आणि अजयमध्ये वाद झाला? आणि शिक्षकांनी समजावल्याचा अजयवर काही परिणाम झाला का? वाचा बालकथा…
अजय सकाळी उठला. तो धावत बाथरूममध्ये गेला. परत येऊन पाहतो तो मम्मी स्वयंपाकघरात गरमागरम पुऱ्या तळत होती. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. अजय म्हणाला, “मम्मी, मला खूप भूक लागलीय.”
तेवढ्यात त्याचं लक्ष गरमागरम चहाकडे गेलं. चहातून वाफ निघत होती आणि वेलचीचा अप्रतिम सुवास येत होता. अजय म्हणाला, “मम्मी, चहा पण दे.”
मम्मी म्हणाली, “ब्रश केलंस का?”
“हो, मम्मी, झालं माझं ब्रश!” अजयने तत्परतेने उत्तर दिलं.
“खरं सांगतोयस ना? इतक्या लवकर ब्रश कसं झालं?” मम्मीने पुन्हा विचारलं.
“हो मम्मी, केलंय.” असं म्हणत अजय नेहमीप्रमाणे खोटं बोलला.
मम्मीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, “ठीक आहे, चल, डायनिंग टेबलवर ये.”
अजयला वाटलं, आजही मम्मी मूर्ख बनली, आणि तो खूप खुश झाला.
शाळेची वेळ झाली. अजय शाळेत गेला. मित्रांसोबत आपल्या जागेवर बसला. दोन पीरियड्स झाले. तेवढ्यात त्याचा सहाध्यायी गौरंग म्हणाला, “अजय, तू माझ्या शेजारी बसू नकोस.”
हे देखील वाचा: वाचा छान छान गोष्टी 6: …आणि चीनू आईला बिलगली:
अजयने विचारलं, “का बसू नको? ही तर माझी जागा आहे. तुला बसायचं नसेल तर जाऊन दुसरीकडे बस.”
यावरून त्यांच्यात वादावादी सुरू झाली.
तेवढ्यात वर्गात शिक्षक आले. त्यांनी विचारलं, “काय झालं? का वाद घालताय तुम्ही दोघं?”
अजय म्हणाला, “सर, गौरंग मला माझ्या जागेवर बसू देत नाही.”
“का रे गौरंग, असं का करतोस?” शिक्षकांनी विचारलं.
गौरंग गप्प राहिला. त्याच्या गप्प बसण्याने शिक्षक ओरडले, “बोल, काय झालंय?”
“सर, अजयच्या तोंडाची दुर्गंधी येते,” गौरंग अडखळत म्हणाला.
शिक्षकांनी हसू दाबत विचारलं, “का रे अजय, ब्रश करतोस की नाही?”
शिक्षकांचा हा प्रश्न ऐकून अजयला शरमल्यासारखं. तो काहीच बोलला नाही.
“का रे अजय, ऐकलं नाहीस का माझं?” शिक्षक जरा जोरात म्हणाले.
“करतो सर, पण रोज नाही करत,” असं म्हणत अजय गप्प बसला. त्याची मान खाली गेली.
शिक्षकांनी आधी गौरंगला समजावलं, “लहानसहान गोष्टींवरून असं भांडत नाहीत. भांडण चांगली गोष्ट नाही.”
नंतर त्यांनी अजयच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं, “अजय, आता तू रोज सकाळी सगळ्यात आधी ब्रश कर. फक्त तोंड, हात-पाय नव्हे, तर पूर्ण शरीराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. चल, आता तुझ्या जागेवर बस.”
अजयला आजच्या घटनेतून मोठा धडा मिळाला. त्याला त्याची खूप लाज वाटली. शाळा सुटली. घरी गेल्यावर त्याने सगळं मम्मीला सांगितलं. मम्मीनेही त्याला स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगितलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी अजय उठताच ब्रश आणि टंग क्लीनर घेऊन बाथरूममध्ये गेला. हे पाहून मम्मीला हसू आलं.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली