सांगली जिल्ह्यातील चित्र सोमवारी स्पष्ट होणार
सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा):
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची बुधवारी छाननी झाली. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील १९५ उमेदवारांचे २३९ अर्ज दाखल झाले होते. त्यांपैकी नऊ उमेदवारांचे ६४ अर्ज अवैध ठरले. मिरज मतदार संघातील वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे पुतणे अपक्ष राजरत्न आंबेडकर यांचाही अर्ज अवैध ठरला. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात १८४ उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत.
अर्ज माघारीचा सोमवार (ता. ४) एकमेव दिवस असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान काही मतदारसंघांत भाजप आणि काँग्रेस आघाडीमध्ये बंडखोरी झाली असून त्यांना रोखण्यासाठी नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी १५ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.
देखील वाचा: Good news: सांगली सायबर पोलिसांची दिवाळी भेट: नागरीकांचे 7.50 लाखांचे 60 मोबाईल परत
मंगळवार (ता. २९) अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. या कालावधीत १९५ उमेदवारांचे २४९ अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची बुधवारी त्या-त्या विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक कार्यालयामध्ये छाननी झाली. छाननीमध्ये मिरज मतदारसंघातील वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे पुतणे राजरत्न यांचा अपक्ष म्हणून दाखल केलेला कागदपत्रातील त्रुटीअभावी अर्ज अवैध ठरला. आठ विधानसभा मतदारसंघांतील १९५ उमेदवारांचे २३९ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी नऊ उमेदवारांचे ६४ अर्ज अवैध ठरले.
यांचे अर्ज ठरले वैध:
डॉ. सुरेश खाडे (मिरज-भाजप), आमदार सुधीर गाडगीळ (सांगली-भाजप), आमदार गोपीचंद पडळकर (जत-भाजप), सत्यजित देशमुख (शिराळा-भाजप), संग्रामसिंह देशमुख (पलूस-कडेगाव), शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (इस्लामपूर) , आमदार मानसिंगराव नाईक (शिराळा), रोहित पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ), वैभव पाटील, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम (पलूस-कडेगाव), आमदार विक्रमसिंह सावंत (जत) यांचे अर्ज वैध ठरले.
त्याचबरोबर पृथ्वीराज पाटील (सांगली), अपक्ष मोहन वनखंडे (मिरज), एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सुहास बाबर( खानापूर-आटपाडी), अजितदादा राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय पाटील(तासगाव-कवठेमहांकाळ), निशिकांत पाटील (इस्लामपूर), शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते (मिरज) या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारीचा सोमवार (ता. ४) दिवस असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जत विधानसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांचे २१ अर्ज वैध
जत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ उमेदवारांनी २४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये भाजपकडून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. आज छाननीदरम्यान पक्षाचा एबी फॉर्म सादर न केल्याने तीन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले आहेत. अंतिम छाननीअंती १७ उमेदवारांचे २१ अर्ज वैध ठरले आहेत.
बुधवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर, नायब तहसीलदार बाळासाहेब सवदे यांनी उमेदवार व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली. अर्ज छाननीवेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे प्रतिनिधी म्हणून समाधान शिंदे व धनंजय क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर यांचे प्रतिनिधी डॉ. रवींद्र आरळी व गणेश धायगुडे उपस्थित होते.
अपक्ष उमेदवार तमन्नगौडा रविपाटील, बसवराज पाटील, निवर्गी, बसपाचे उमेदवार विक्रम ढोणे, अपक्ष उमेदवार संजयराव कांबळे, अपक्ष उमेदवार शंकरराव वगरे यांचे प्रतिनिधी म्हणून शहाजी वाघमोडे, अपक्ष उमेदवार सुरेशराव शिंदे यांचे प्रतिनिधी इमरान गवंडी, अपक्ष उमेदवार दत्तात्रेय भसनूर, अण्णासो टेंगले उपस्थित होते. दरम्यानच्या कालावधीत कोणत्याही उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्या संदर्भात हरकती नोंदवलेल्या नाहीत. प्रशासनाने काटेकोर काम बजावले.