सांगली जिल्ह्यातील पेठ, महादेववाडी येथे कारवाई
सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा):
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पथकाने बुधवारी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात महादेववाडी येथील महिला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना इस्लामपूर येथे एका हॉटेलात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या अर्जावर मृत्युपत्राची नोंद घेऊन सातबारा सदरी नाव लावण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
प्रकरणाचा तपशील
तक्रारदार, वय 29 वर्षे, sangli जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्या आजोबांनी 2004 मध्ये मृत्युपत्र करून त्यांची वडिलोपार्जित जमीन तक्रारदाराच्या आईच्या नावे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर (2009)ही जमिनीची नोंदणी पूर्ण झाली नव्हती. यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालय, महादेववाडी येथे अर्ज सादर केला होता.
आरोपी लोकसेवक
1. सोनाली कृष्णाजी पाटील, वय 35 वर्षे, तलाठी, महादेववाडी.
2. मल्हारी शंकर कारंडे, वय 49 वर्षे, मंडळ अधिकारी, पेठ.
3. हणमंत यशवंत गोसावी, कोतवाल, महादेववाडी.
लाचेची मागणी
तक्रारदाराच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तलाठी सोनाली पाटील आणि कोतवाल हणमंत गोसावी यांनी 25,000 रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यानंतर विभागाने सापळा रचला. सापळा कारवाईच्या दरम्यान आरोपींनी तडजोडीअंती 24,000 रुपये स्वीकारण्यास मान्यता दिली. इस्लामपूर तहसील कार्यालयासमोरील हॉटेल आण्णा बुट्टे येथे ही रक्कम स्वीकारताना तलाठी सोनाली पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सापळा कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या sangli पथकाने, पोलीस उप अधीक्षक उमेश दा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. सापळा पथकात पोलिस निरीक्षक किशोरकुमार खाडे आणि इतर पोलीस अंमलदारांचा समावेश होता. आरोपींविरुद्ध इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा.
संपर्क तपशील:
पोलीस उप अधीक्षक, सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
मो. क्र. 9552539889
कार्यालय क्र.: 0233-2373095
ईमेल: dyspacbsangali@gmail.com
टोल फ्री: 1064