सारांश: धुळे-सोलापूर महामार्गावरील पळसवाडी शिवारात रविवारी सकाळी टेंपो नादुरुस्त ट्रॅक्टरला धडकल्याने भीषण अपघात झाला. टेंपोला आग लागल्याने चालक विनायक पाटील आणि दादासाहेब देशमुख होरपळून मृत्युमुखी पडले, तर सलीम मुल्लानी गंभीर जखमी झाले. महामार्ग पोलिसांनी तातडीने मदत केली आणि जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
धुळे-सोलापूर महामार्गावरील पळसवाडी (ता. खुलताबाद) शिवारात रविवारी (ता. ९) सकाळी भीषण अपघात घडला. नादुरुस्त ट्रॅक्टरला धडकल्यानंतर टेंपोने (छोटा हत्ती) पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
या दुर्घटनेत विनायक पाटील (वय ३५, शिरढोण, ता. कवठेमहांकाळ जिल्हा सांगली ) आणि दादासाहेब देशमुख (वय ३५, रा. अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, सलीम मुल्लानी (वय ४०, मळणगाव, ता. कवठेमहांकाळ) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनाक्रम कसा घडला?
छत्रपती संभाजीनगर येथून कन्नडकडे जात असलेला टेंपो (एमएच ४ एचडी ३०४९) पळसवाडी शिवारात नादुरुस्त ट्रॅक्टरला धडकला. या धडकेनंतर टेंपोने पेट घेतला. चालक विनायक पाटील आणि बाजूला बसलेले दादासाहेब देशमुख हे टेंपोत अडकल्याने होरपळून गंभीर जखमी झाले.
महामार्ग पोलिसांची तातडीची मदत
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत विनायक पाटील यांचा मृत्यू झाला होता. इतर दोघांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दादासाहेब देशमुख यांनीही प्राण सोडला.
परिसरात हळहळ
देशमुख हे मंडप व्यवसायिक होते आणि छत्रपती संभाजीनगर येथे काही साहित्य खरेदीसाठी गेले होते. मात्र, या दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. खुलताबाद पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलिस निरीक्षक राहुल लोखंडे यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली.
हे देखील वाचा: jat crime news: अत्याचार करून 4 वर्षांच्या बालिकेचा खून : जत तालुक्यात संतापाची लाट
दुचाकींच्या धडकेत तीन ठार
देगलूर : दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर धडकेत तीन जण ठार झाल्याची घटना रविवारी (ता. नऊ) सायंकाळी अंतापूरजवळ (ता. देगलूर) घडली.
अंतापूर येथील यादव तुकाराम पंदिलवाड (वय ४४), गणेश विठ्ठल लातूरकर (५०) हे दुचाकीने चैनपूर या गावी जात होते. पोतंगल (तेलंगण) येथून शेख अजिज शेख जाकीर (२७) हे मोटरसायकलने (टीएस ११ इएस ३५०१) औरादला (कर्नाटक) येथे निघाले होते. दोन्ही दुचाकींची धडक होऊन तिघेही गंभीर जखमी झाले.
उपचारापूर्वीच चैनपूर येथील दोघांचा मृत्यू झाला. पोतंगल येथील तरुणास पुढील उपचारासाठी बोधनला नेले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. accident news