रांजणी हे गाव कवठेमहांकाळ (जि. सांगली) तालुक्यात आहे
वीर जवानांच्या कथा आणि गाथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. जाज्वल्य देशाभिमान, निस्सीम धैर्य, भीमपराक्रम, आणि अपार त्याग पाहून अभिमानाने मान उंचावते. पहिल्या महायुद्धापासून ते कारगिलपर्यंतच्या प्रत्येक रणांगणात पराक्रम गाजवलेल्या जवानांचे गाव सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी आहे. हे गाव देशप्रेमाने भारलेले सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते.
रांजणीला सैनिकांची मोठी परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात (१९१४-१९१८) या गावातील शंभरावर सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढा दिला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषात, परकीय भूमीवर त्यांनी आपले पराक्रम सिद्ध केले. बळवंत यशवंत भोसले, गणपती ज्ञानू भोसले, पितांबर तात्या देसाई, आणि राजाराम बाबाजी सूर्यवंशी यांनी पहिल्या महायुद्धात मोठे शौर्य गाजवले.
गावात डझनभर कुटुंबांत एक ना एक तरुण सेनादलात असतो
रांजणीतील बरेच सैनिक या युद्धात शहीद झाले. दुसऱ्या महायुद्धात (१९३९-१९४५) रांजणीतील अधिकाधिक तरुणांनी सैन्यात भरती होऊन परकीय भूमीवरही पराक्रमाची नोंद केली. या गावात जन्माला आलेले मूल जणू सेनादलात जाण्याचे स्वप्न घेऊनच जन्माला येते. इथल्या प्रत्येक बापाचे स्वप्न असते की त्याचा मुलगा सैन्यात भरती व्हावा. ‘मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनाला भरे कापरे,’ असा धाक रांजणीतील सैनिकांनी निर्माण केला आहे. गावात डझनभर कुटुंबांत एक ना एक तरुण सेनादलात असतो.
रांजणीतील जवानांची सैनिकी परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. इथे विवाह होऊन येणाऱ्या मुलीही सैनिकी परंपरेच्या कुटुंबातीलच असतात, त्यामुळे इथले मूल सैनिकी संस्कारांत वाढते आणि सेनादलात भरती होण्याची ऊर्मी घेऊनच वाढते.
पहिल्या महायुद्धात येथील चार जवान शहीद झाले. दुसऱ्या महायुद्धात ज्ञानेश्वर रामचंद्र भोसले, भगवान अण्णाप्पा भोसले, शंकर ज्ञानू भोसले, लक्ष्मण माने, रामराव भोसले, तुकाराम कृष्णा पवार, सखाराम सोनूर, बापू पवार, वसंत बंडा भोसले, सखाराम चव्हाण, सखाराम पवार, निवृत्ती पवार यांच्यासह अनेक सैनिकांनी पराक्रम गाजवला. १९७१ च्या इंडो-पाक युद्धात विलास पांडुरंग साळुंखे यांनी वीरगती प्राप्त केली.
रांजणीच्या जवानांनी शौर्याची परंपरा कायम राखली
सैन्यदल, नौदल, आणि वायुदलात रांजणीच्या जवानांनी शौर्याची परंपरा कायम राखली आहे. सु. ऑ. लेफ्टनंट कृष्णराव भाऊराव भोसले, हवालदार पांडुरंग आबासाहेब भोसले, शांताराम बळवंतराव भोसले यांना त्यांच्या पराक्रमाबद्दल विविध पदकांनी गौरवले गेले आहे. सध्या तीनही दलात ५५० सैनिक आणि सैन्याधिकारी कार्यरत आहेत. गावापासून प्रेरणा घेत पंचक्रोशीतील शेकडो तरुण सेनादलात रुजू होत आहेत. जिल्ह्यात २२ हजार आजी-माजी सैनिक आहेत, त्यातील सात हजार पंचक्रोशीतील आहेत.
येथील कर्नल संपतराव साळुंखे, कॅप्टन सदाशिव भोसले यांसारखे वीर गावाचे भूषण आहेत. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे विजय यमगर रांजणीचे वीर सैनिक आहेत, ज्यांना त्यांच्या पराक्रमाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक मिळाले आहे. लेफ्टनंट कर्नल सतीश चंद्रसेन भोसले कोटा येथे कार्यरत आहेत, आणि मनोज नेताजी देसाई लेफ्टनंट आहेत. गावातील संदीप साळुंखे भारतीय नौदलात कमांडर आहेत.
पहिल्या महायुद्धापासून ते आजपर्यंत रांजणीच्या तीन हजारांवरील युवकांनी सैनिक बनून देशसेवा बजावली आहे. गावातील प्रत्येक घरात पणजोबा ते नातू अशी पिढ्यान् पिढ्यांची सैनिकी परंपरा चालत आली आहे. इथल्या प्रत्येकाच्या नसानसात देशभक्ती आहे. डॉक्टर, इंजिनिअर, कलेक्टर, तहसीलदार बनण्याचे स्वप्न प्रत्येक तरुणाचे असते, पण येथील प्रत्येक युवकाचे स्वप्न सैन्यात जाणे आणि अधिकारी बनणे हेच असते. रांजणीच्या गौरवशाली परंपरेचा, इथल्या शौर्याने भारलेल्या पावन मातीचा तो गुण आहे.
रांजणीत आहे शिवरायांचे मंदिर
या गावाला मोठी सैनिकी परंपरा आहे. गावाने एकत्र येऊन १२ जून १९३२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधले आहे. या मंदिरात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा आहे. या मंदिरात दररोज सकाळी शिवरायांची पूजा आणि आरती होते. ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’ या ओळींना जागत इथल्या मातीत जन्मलेला प्रत्येक जण जीवनाची लढाई जिंकण्याची शिकवण घेतो.