बनावट

पुणे,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २८.६६ लाख रुपयांच्या बनावट नोटा, २.०४ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा, तसेच नोटा छापण्याचे साहित्य आणि कार जप्त केली आहे.

बनावट नोटा

कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेतील सीडीएम मशीनमध्ये २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा सापडल्याने बँक व्यवस्थापकाने २७ एप्रिल २०२५ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीनंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेत मनिषा स्वप्निल ठाणेकर, भारती तानाजी गवंड आणि सचिन रामचंद्र यमगर या तिघांना अटक केली.

हेदेखील वाचा: Shocking! अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याने डॉक्टरच्या करिअरवर घाला; बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून खऱ्या डॉक्टरला ‘मुन्नाभाई’ ठरवण्याचा डाव उघड

अटक आरोपींच्या चौकशीतून पोलिसांना नरेश भिमप्पा शेटटी या मुख्य सूत्रधाराचे नाव समजले. पोलिसांनी लोहगाव येथील नरेशच्या घरावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा व छपाईचे साहित्य सापडले. त्याच्याकडून २०० रुपयांच्या २० बंडल Fake currency (मूल्य सुमारे ४ लाख रुपये), खऱ्या नोटा २.०४ लाख रुपये, नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर, शाई, कोरे कागद व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

तसेच एका कारमधून २०० रुपयांच्या ६४८ Fake currency आणि ५०० रुपयांच्या ३ Fake currency मिळून एकूण १.३१ लाख रुपयांची बनावट रक्कम हस्तगत करण्यात आली. इतर आरोपी भारती गवंड, मनिषा ठाणेकर आणि सचिन यमगर यांच्याकडूनही अनुक्रमे ६०,०००, २०,००० आणि २०,००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

पुढील तपासात आरोपी नरेश शेटटी याला या गुन्ह्यात प्रभू गुगलजेडडी याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यालाही अटक करून त्याच्याकडून २०० रुपयांच्या ३,००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

हेदेखील वाचा: kolhapur crime news: कोल्हापूरमध्ये मोठा चोरीचा पर्दाफाश : 3 अट्टल चोरटे जेरबंद, तब्बल 32 घरफोड्यांचे गुन्हे उघड, 67 लाखांचा मुद्देमाल जप्त

आजपर्यंत या कारवाईत पोलिसांनी २८,६६,१०० रुपयांच्या Fake currency, २,०४,००० रुपयांच्या खऱ्या नोटा, नोटा छापण्याचे साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. आरोपींना २९ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, बनावट नोटा छपाईसाठी वापरण्यात आलेल्या लॅपटॉपचा व इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपआयुक्त संदिपसिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सुर्यवंशी, आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *