सांगली, (आयर्विन टाइम्स / खास प्रतिनिधी):
गेल्या काही वर्षांत तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धारदार शस्त्रे बाळगण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पुण्यातील कुख्यात ‘कोयता गँग’ चे लोण सांगलीपर्यंत पोहोचल्याने जिल्हा पोलिसांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला. वर्षभरात पोलिसांनी ३८ पिस्टल आणि ३०६ घातक हत्यारे जप्त करून १६२ जणांना अटक केली आहे. विशेषतः गावठी कट्टा आणि देशी पिस्टल बाळगणाऱ्या ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हेगारी वर्चस्वासाठी धारदार शस्त्रांचा वापर
पूर्वी केवळ कुख्यात गुन्हेगारांकडे हत्यारे सापडत असत, मात्र आता तरुण आणि अल्पवयीन मुलांतही त्याची क्रेझ वाढली आहे. सांगलीतील एका मोबाईल दुकान चालकाचा खून शाळकरी मुलांनीच धारदार कोयत्याने केला, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्याचे अभियान राबवले.
हेदेखील वाचा: Eid Mubarak: ईदच्या उत्सवात रंग भरणारी बॉलिवूडची महत्त्वपूर्ण 8 गाणी
गेल्या वर्षभरातील पोलिस कारवाई:
– ३८ गावठी पिस्टल जप्त, २७ गुन्हे दाखल
– ८६ कोयते, ४३ तलवारी, ७ कुकरी, १६ चाकू, ५ एडके, २ चॉपर, १ कुर्हाड, १ विळा, १ गुप्ती जप्त
– शस्त्र बाळगणाऱ्या १६२ जणांना अटक, १२४ गुन्हे दाखल
अवैध शस्त्रांची तस्करी आणि विल्हेवाट
देशी पिस्टल आणि गावठी कट्टे मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशसारख्या राज्यांतून तस्करीने आणले जातात. अवघ्या २० ते २५ हजार रुपयांत हे शस्त्र सहज उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण त्यांचा वापर करत आहेत. अटक केलेल्या आरोपींपर्यंत पोलिस पोहोचतात, मात्र तस्करीच्या साखळीपर्यंत पोहोचणे कठीण ठरत आहे. जप्त करण्यात आलेली शस्त्रे न्यायालयाच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नष्ट केली जातात. पिस्टलची तपासणी मुख्यतः मुंबईतील प्रयोगशाळेत केली जाते, मात्र त्याचा अहवाल यायला दीर्घ काळ लागतो.
कायदा आणि पुढील उपाययोजना
सार्वजनिक ठिकाणी कोयता, तलवार किंवा इतर धारदार शस्त्र घेऊन फिरणे हा गुन्हा मानला जातो. आर्म्स अॅक्ट आणि भारतीय दंड संहितेनुसार अशी शस्त्रे बाळगणे किंवा त्यांचा वापर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. सांगली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. भविष्यात अवैध शस्त्रसाठ्यावर अधिक तीव्र कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.