जत

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक प्रकल्प हाती घेतले जातील. जत तालुक्यातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि तालुक्याचा सुजलाम्-सुफलाम् विकास करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

जत

जत येथे आयोजित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) संदर्भातील सरपंच मेळाव्यात मंत्री गोगावले बोलत होते. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, मिशन मनरेगाचे महासंचालक श्री. नंदकुमार, जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपवनसंरक्षक नीता कट्टे, मनरेगाचे राज्य गुणनियंत्रक राजेंद्र शहाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे,

त्याचबरोबर प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, रोहीनी शंकरदास, आनंदा लोकरे, डॉ. रवींद्र आरळी, ब्रम्हानंद पडळकर, सुनील पवार, सरदार पाटील, संजयकुमार तेली, आप्पासो नामद, आकाराम मासाळ, दिग्वीजय चव्हाण, लक्ष्मण जखगोंड, प्रभाकर जाधव, अण्णा भिसे, परशूराम मोरे, रवी मानवर, आर. के. पाटील, शिव तावंशीआणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा: jat crime news: नागज-जत दरम्यान जांभूळवाडीजवळ अपघात: कोसारी येथील 25 वर्षीय युवकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

रोजगार हमी योजनेतून प्रभावी विकासकामांची ग्वाही
यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी रोजगार हमी योजनेतून जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली जातील, असे सांगितले. तालुक्यातील शेतजमिनींच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

जत

“रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. जास्तीत जास्त प्रोत्साहनपर कामे राबवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा,” असे ते म्हणाले.

बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन व अनुदान
राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी जलसंधारण व वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “बांबू लागवड ही कमी खर्चिक व फायदेशीर शेती पद्धत आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे यासाठी विशेष अनुदान दिले जाते. 100 दिवसांची मजुरीही दिली जाते. एक एकर बांबू लागवडीतून वर्षाला एक लाख रुपये मिळू शकतात.”

याशिवाय, “जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीतून जत तालुक्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्यात येईल,” असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा: sangli crime news: सांगलीतील खूनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पोलिसांनी केली अटक; एप्रिल 2024 मध्ये घडले होते हत्याकांड

मनरेगामार्फत लखपती होण्याची संधी
मिशन मनरेगाचे महासंचालक श्री. नंदकुमार यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत 266 प्रकारची कामे उपलब्ध असून ती निकषानुसार प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले.

“नागरिकांनी रोजगार हमी योजनेला केवळ मजुरीचे साधन न समजता, ती लखपती होण्यासाठीचा मार्ग मानावा. तुती लागवड, फळबाग लागवड, जलसंधारण आदी उपक्रमांतून आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येऊ शकते,” असे ते म्हणाले.

जत

जतच्या विकासासाठी एकजुटीची गरज
आमदार सदाभाऊ खोत यांनी जत तालुक्यातील जनतेच्या कष्टाळू स्वभावावर भर देत विकासासाठी संघटित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

“जत सांगली जिल्ह्याचा शेवटचा टोक आहे. तालुक्याचा विकास हा शासनाच्या मदतीने आणि नागरिकांच्या सहकार्यातून शक्य आहे,” असे ते म्हणाले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळी जिल्ह्यांच्या विकासासाठी शासन भरीव निधी देत असल्याचे सांगत, “तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार हमी योजनेंतर्गत लखपती करण्याचा निर्धार करूया,” असे मत व्यक्त केले.

हे देखील वाचा: Love Story Movies: व्हॅलेंटाईन आठवड्यात पाहण्यासारखे 8 उत्कृष्ट प्रेमकथा चित्रपट; हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या प्रेमकथा, ज्या आजही संस्मरणीय आहेत

प्रदर्शन व माहितीपटाचे आयोजन
कार्यक्रमाच्या शेवटी जत तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांवर आधारित लघुचित्रफीत दाखवण्यात आली. तसेच, प्राणवायू रथाचे उद्घाटन करण्यात आले. या बसमध्ये बांबू लागवडीची माहिती देणारी स्क्रीन आणि वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.

सरपंच संघटना व रोजगार सेवक संघटनेतर्फे मंत्री भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले, तर गटविकास अधिकारी आनंदा लोकरे यांनी प्रास्ताविक भाषण केले.

उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे योगदान
या कार्यक्रमास तालुक्यातील अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed