खुनाच्या प्रकरणातील आरोपी मूळचा जत तालुक्यातला
सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने २०१८ साली घडलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी सरफराज ताजुद्दीन निपाणी (वय ३१, रा. जत, सध्या रा. फ्लॅट नं. ५, साईसदन अपार्टमेंट, १०० फुटी रोड, पाटील टी डेपोचे पाठीमागे, विश्रामबाग, सांगली) याला दोषी ठरवून आजीवन सश्रम कारावासाची (जन्मठेप) शिक्षा सुनावली आहे. तसेच, आरोपीला ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त सश्रम शिक्षा भोगावी लागणार आहे.
प्रकरणाचा थोडक्यात आढावा
घटना ६ डिसेंबर २०१८ रोजी विश्रामबाग, सांगली येथील साईसदन अपार्टमेंटमध्ये घडली. आरोपी सरफराज ताजुद्दीन निपाणी याने फिर्यादी राजलक्ष्मी पाटील यांचे पती प्रशांत सुर्यकांत पाटील यांच्याकडून २०१७ मध्ये २ लाख रुपये उसने घेतले होते. परंतु तीन महिन्यांत परतफेड करण्याचे आश्वासन देऊनही आरोपीने रक्कम परत केली नाही.
रक्कम मागितल्यावर झालेल्या वादावादात आरोपीने लोखंडी गज आणि कोयत्याचा वापर करून प्रशांत पाटील यांना गंभीर जखमी केले आणि त्यांचा खून केला. राजलक्ष्मी पाटील यांनी या घटनेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
प्रकरणी तपास व खटला
फिर्यादीने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.पी. सोनवलकर यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाने प्रकरण सिद्ध करण्यासाठी एकूण ६ साक्षीदार तपासले. फिर्यादी राजलक्ष्मी पाटील यांची प्रत्यक्षदर्शी साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपी दोषी ठरला.
न्यायालयाचा निर्णय
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.के. शर्मा यांनी आरोपीला भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत आजीवन कारावास आणि ५००० रुपयांचा दंड तसेच भा.दं.वि. कलम ५०६ अंतर्गत १ महिन्यांचा सश्रम कारावास आणि ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
पोलिसांचे योगदान
या प्रकरणाच्या तपासात पैरवी कक्षातील अशोक तुराई, वंदना मिसाळ, तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्यातील सनी मोहिते यांचे विशेष योगदान लाभले. सांगली न्यायालयाच्या पैरवी कक्षानेही या प्रकरणात मोलाचे सहकार्य केले.