कुरळप येथील संशयित हिंसक वृत्तीचा
इस्लामपूर (आयर्विन टाइम्स):
सांगली जिल्ह्यातील कुरळप गावात वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात इस्लामपूर पोलिसांनी केवळ पाच दिवसांत संशयित आरोपी म्हाकू आनंदा दोडे (वय ४७) यास पकडण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे नसल्याने तसेच आरोपीने मोठ्या चलाखीने पुरावे मिटवल्याने पोलिसांसमोर अनेक आव्हाने होती. पोलिसांनी कसून शोध घेत, अविरत तपास मोहीम राबवून गुरुवारी (ता. १३) आरोपीला ऐतवडे खुर्द येथील स्मशानभूमीजवळ विळा घेऊन बसलेले असताना अटक केली.
घटना कशी घडली
गुरुवारी, ८ तारखेला कुरळप येथील इंदूबाई राजाराम पाटील यांचा निर्घृण खून झाला. इंदूबाई या घरी एकट्याच राहत होत्या. त्या नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता शेळ्यांना चारा आणण्यासाठी ऐतवडे खुर्द येथील पवार मळ्यात गेल्या होत्या. मात्र, सायंकाळ झाली तरी त्या घरी परतल्या नाहीत. शेजाऱ्यांनी शोध घेतला, पण त्या आढळून आल्या नाहीत. अंधारामुळे शोध मोहीम थांबवावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोधकार्य पुन्हा सुरू केले असता, महादेव पवार यांच्या शेताच्या बांधावर इंदूबाई यांच्या साडीचा तुकडा आढळला.
संशयित आरोपीची पार्श्वभूमी आणि तपासाची आव्हाने
संशयित म्हाकू हा हिंसक वृत्तीचा असून, त्याला रानात भटकण्याची सवय होती. तो आपल्या आई व पत्नीवर देखील अत्याचार करत असे. त्याच्याकडे मोबाईल नव्हता आणि त्याच्या मित्रपरिवाराची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी आल्या. गुन्ह्याचा कसून तपास करण्यासाठी पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रमुख विक्रम पाटील आणि त्यांच्या टीमने रात्रंदिवस मोहीम राबवली.
शोधमोहीम आणि अटक
शोधमोहीमेच्या अखेरच्या टप्प्यात ऐतवडे खुर्द येथील स्मशानभूमीजवळ म्हाकू हा एका विळ्यासह बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुरुवारी (ता. १३) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास ताब्यात घेतले. अत्याचारास विरोध केल्याने खून केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. पुढील तपासासाठी इस्लामपूर न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कुरळप खून प्रकरणात त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. आरोपीस खून करण्याचे मुख्य कारणाबाबत विश्वासात घेवून विचारले असता यातील आरोपीने मयत महिला हिचेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असताना मयत महिलेने त्यास प्रतिकार करून आरडा-ओरडा केला. त्यामुळे आरोपीने तिचे हात व तोंड बांधून पोटावर विळ्याने गंभीर वार करून तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस दलाची टीम आणि तपास प्रक्रियेतील यशस्वी कामगिरी
या तपासात ठाणे प्रमुख विक्रम पाटील यांच्यासह सहायक निरीक्षक राजेंद्र जाधव, चंद्रकांत कोळी, शरद जाधव, राहुल पाटील, कौस्तुभ पाटील, प्रशांत देसाई, प्रशांत चंद आणि सलमान मुलाणी यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक काम केले. त्यांची ही तडफदार कामगिरी वर्धनीय आहे.
कुरळप खून प्रकरणात पोलिसांची जलद कार्यवाही आणि अथक तपास मोहीम यामुळे आरोपीला केवळ पाच दिवसांत पकडण्यात यश आले असून, परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.