सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर
सांगली,(आयर्विन टाइम्स):
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजविरोधी घटकांवर नजर ठेवत, सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) विना परवाना दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर तीन मोठ्या कारवाया केल्या आहेत. जत, चिंचणी-वांगी आणि इस्लामपूर या ठिकाणी कारवाई करत एकूण १,५६,७३० रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर व पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी पार पाडली आहे.
प्रकरण १: चिंचणी-वांगी पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई
दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८:१० वाजता येडेमच्छिंद्र गावातील पैलवान ढाब्याच्या मागे छापा टाकण्यात आला. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अमोल सूर्यकांत शिंदे (वय ३१, पत्ता: येडेमच्छिंद्र, ता. वाळवा जि. सांगली) हा बेकायदा विदेशी दारूचा साठा ठेवून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ४७,४२० रुपये किंमतीच्या इंपिरियल ब्लू, मॅक्डॉवेल्स, टुबर्ग आणि किंगफिशर बीअरच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणात चिंचणी-वांगी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकरण २: इस्लामपूर पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई
दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ३:४५ वाजता इस्लामपूर शहरातील शिराळा नाका येथे पोलीस पथकाने आरोपी मनोज दत्तात्रय शिंदे (वय ४३, पत्ता: क्रांतीसिंहनगर, इस्लामपूर जि. सांगली) याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याजवळ ५०,१९० रुपये किंमतीच्या विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्यात मॅजिक मुव्हमेंट, ८ पी.एम., रम, ब्रँडी, आणि वोडका यांचा समावेश होता. इस्लामपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकरण ३: जत पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई
दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १:०० वाजता सनमडीकर कॉलेजजवळ जत येथील जत-वळसंग रस्त्यावर आरोपी चेतन श्रीकांत यलगार (वय २१, पत्ता: माडग्याळ जि. सांगली ) याला पोलिसांनी मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याजवळ ५९,१२० रुपये किंमतीच्या रॉयल स्टॅग दारूचा साठा जप्त करण्यात आला. जत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अधिका-यांचे मार्गदर्शन आणि पुढील तपास
सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागु असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या कडक कारवाईचे हे एक उदाहरण आहे. मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार, एलसीबी शाखेचे पथक विविध विभागांत कार्यरत असून अवैध धंद्यावर आळा घालण्याचे कार्य करत आहेत.