विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली lcb ची कारवाई
सांगली/ आयर्विन टाइम्स
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सांगली जिल्ह्यातील अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. या कारवाईत ५० लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली.
गुन्ह्याची माहिती
मिरज ते सांगोला मार्गावर बेकायदेशीरपणे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार गुंडोपंत दोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. त्या आधारे, नागज गावाच्या हायवेवर सापळा लावण्यात आला. पहाटेच्या सुमारास आयशर मालवाहतूक गाडी क्र. के. ए. २२ डी. ७४२५ अडवण्यात आली. चालक रायाप्पा कप्पान्ना पुजारी (वय ३५) आणि त्याचा सहकारी सुनिल ज्ञानोबा शिंदे (वय ४२) यांना अटक करण्यात आली.
जप्त केलेला मुद्देमाल
– विमल पान मसाला (सुगंधी तंबाखू): १३,२०० पुडे, अंदाजे किमत २६,१३,६०० रुपये
– टोबॅको किंग पॅक (गुटखा): १९,८०० पुडे, अंदाजे किमत ४,३५,६०० रुपये
– वाहन: आयशर मालवाहतूक गाडी आणि टोयोटा इटीओस कार, किमती अनुक्रमे १५,००,००० आणि ५,००,००० रुपये.
एकूण मुद्देमाल ५०,४९,२०० रुपयांचा असून तो जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील
सदर कारवाईत पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पोलीस कर्मचारी गुंडोपंत दोरकर, अमर नरळे, सोमनाथ गुंडे यांचा समावेश होता. आरोपींनी मान्य केले की हा माल पंढरपूरला पोहचविण्यासाठी पाठविण्यात आला होता. तपासादरम्यान पुढील माहिती मिळाल्यावर आणखी आरोपींवर कारवाईची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी स्पष्ट केले की, “आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कारवाई सुरू राहील. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
आरोपींवर गुन्हे दाखल
आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या कलम २७४, १२३, १३५८ आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्बंधांचा भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.