वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इस्लामपूर/ आयर्विन टाइम्स
भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलच्या धडकेत सांगली जिल्ह्यातील करंजवडे (ता. वाळवा) येथील प्राथमिक शिक्षक चंद्रशेखर बबनराव पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची तक्रार कृष्णात शशिकांत मोरे यांनी कुरळप पोलीस ठाण्यात दाखल केली असून, संशयित दुचाकी चालक महावीर श्यामगोंडा पाटील (रा. ऐतवडे बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची सविस्तर माहिती
चंद्रशेखर पाटील, करंजवडे येथील शिक्षक, चार दिवसांपूर्वी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर करंजवडे-ऐतवडे बुद्रुक रस्त्यावर व्यायामासाठी फिरायला गेले होते. व्यायामानंतर ते शेतातून परतत असताना, महावीर पाटील हे त्यांच्या दुचाकीवरून भरधाव वेगाने येत होते. पाठीमागून दुचाकीची जोरदार धडक बसल्याने चंद्रशेखर पाटील जागीच कोसळले. या धडकेने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तात्काळ त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने चार दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला.
समाजातील हळहळ
चंद्रशेखर पाटील हे सध्या वाळवा तालुक्यातील प्राथमिक मराठी शाळा, चिकुर्डे येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी जालना व कुरळप येथे अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले होते. अत्यंत तळमळीने शिकवणारे आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदर निर्माण करणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच, वाळवा तालुक्यातील परिसरातील शिक्षक वर्ग, विद्यार्थी, आणि नागरिकांत शोककळा पसरली आहे.
या अपघाताच्या तपासाचे काम कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खोमणे करत आहेत.