सानिया ही जत येथे तिच्या मावशीकडे दोन दिवस राहण्यासाठी आली होती.
जत/ आयर्विन टाइम्स
जत शहरातील वळसंग रोडवर घराच्या छतावर खेळत असताना विद्युत तारेला हाताचा स्पर्श झाल्याने धक्का लागून एका सहा वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. सानिया सिकंदर मुल्ला (वय ६, सोरडी, ता. जत) असे मृत मुलीचे नाव असून आज दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत जत पोलिस ठाण्यात दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे. मृत सानिया ही जत येथे तिच्या मावशीकडे दोन दिवस राहण्यासाठी आली होती. शनिवारी ती गावाकडे परत जाणार होती. शुक्रवारी दुपारी घरातील अन्य मुलांसमवेत ती घराच्या छतावर खेळण्यासाठी गेली होती. यावेळी घराच्या छतावरून विद्युत तार गेली आहे.
यावेळी खेळताना सानियाचा हात वरील विद्युत तारेला लागला. विद्युत प्रवाह सुरू असल्याने तिला जोराचा धक्का बसला आणि जागीच कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला.
सायंकाळी तिचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून या घटनेची सायंकाळी पोलिसात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. जत पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील शिक्षकांच्या वाहनाला अपघात: बेळंकीजवळ चारचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात; दोन्ही वाहनांतील ४ शिक्षक गंभीर जखमी
मिरज/ आयर्विन टाइम्स
दिघंची- हेरवाड राज्यमार्गावर बेळंकी येथे शुक्रवारी सायंकाळी दोन मोटारींची धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनामधील रावळगुंडवाडी व बेळंकी हायस्कूलमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जखमी झाले. या जखमींमध्ये जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील दोन शिक्षकांचा समावेश आहे.
दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक
याबाबत अधिक माहिती अशी की, दिघंची- हेरवाड मार्गांवर बेळंकी येथील मांगिरा मळ्यानजीक शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल बेळंकीमधील शिक्षक, कर्मचारी शाळा सुटल्यानंतर गाडीने (एमएच १० सी एक्स ७५९७) मिरजकडे जात होते. तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील महादेव हायस्कूलमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी दुसऱ्या वाहनाने ( एमएच ४५, ३२४१) सलगरेहून रावळगुंडवाडीकडे जात असताना हा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चक्काचूर
या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चक्काचूर होऊन शिक्षक, कर्मचारी गंभीर जखमी झाले. हा अपघात झाल्यानंतर काही क्षणातच बेळंकीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर दुखापत झालेल्या शिक्षकांना मिरजेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिस पाटील चंद्रकांत पाटील व ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलिसांना दिली.
शेगावमध्ये ११ हजारांची दारू जप्त
जत ते सांगोला रोडवरील शेगाव गावाच्या हद्दीत ईश्वर ढाब्याच्या पाठीमागे रविकिरण दत्तात्रय निकम (वय २३ वर्षे रा. मोकाशीवाडी ) याच्याकडून बेकायदा ११ हजार ५७५ रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा जत पोलिसांनी केली. रविकिरण निकम याने बेकायदा तसेच बिगर परवाना विदेशी दारू व बिअर असे एकूण ११ हजार ५७५ रुपये किमतीची दारू विक्रीसाठी बाळगून व त्यास बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला. रविकिरण निकम त्याच्याकडून बियर, विदेशी, देशी दारू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. निर्भया पथकाचे पोलिस केरूबा चव्हाण यांनी निकम याच्याविरोधात फिर्याद दिली.