काळी जादू आणि करणीचा बळी
आयर्विन टाइम्स / कोल्हापूर
काळी जादू आणि करणी काढण्याचे आमिष दाखवून कोल्हापुरातील एका वृद्धाला ८४ लाख ६९ हजार रुपयांचा मोठा गंडा घालण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हा गुन्हा घडला असून, वृद्धाने आपल्या वडिलार्जित मालमत्तेसंदर्भातील न्यायालयीन प्रकरण आणि कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी या फसवणुकीचा बळी ठरला आहे.
फिर्याद आणि फसवणुकीचा प्रकार
फिर्यादी सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७, रा. गंगावेश, कोल्हापूर) यांनी राजवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी विविध धार्मिक पूजांच्या माध्यमातून करणी, काळी जादू आणि कौटुंबिक समस्या सोडवण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली. या आरोपींमध्ये पाटील महाराज (पाटणकर), अण्णा ऊर्फ नित्यानंद नायक, सोनाली पाटील ऊर्फ धनश्री काळभोर, कुंडलिक झगडे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
काळी जादू आणि करणीची बतावणी
फेब्रुवारी २०२३ मध्ये गोळे नावाच्या व्यक्तीने जेजुरीच्या पुजारी असल्याचे भासवून सुभाष कुलकर्णी यांना काळी जादू आणि करणी काढण्यासाठी संपर्क साधला. पाटील महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी कुलकर्णी यांच्या घरावर करणी झाली असल्याचे सांगत, त्यातून सुटका करण्यासाठी विविध धार्मिक विधी आणि पूजांचा सल्ला दिला.
फसवणूक आणि आर्थिक लूट
कुलकर्णी यांची श्रद्धा आणि अडचणींचा गैरफायदा घेत आरोपींनी त्यांना कणकवली येथे नेऊन तिथे तृप्ती मुळीक नावाच्या व्यक्तीच्या घरात पूजेसाठी बोलावले. पूजेच्या नावाखाली आरोपींनी सुमारे ५४ लाख ८४ हजार रुपये बँक खात्यांवर वर्ग करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर ४९ तोळे सोने, चांदीचे अलंकार, रोख रक्कम आणि प्रापंचिक वस्तू घेऊन एकूण ८४ लाख ६९ हजारांची फसवणूक करण्यात आली.
पुरातन वस्तूंवर डल्ला
घरातील अनेक वस्तूंवर काळी जादू करण्यात आली असल्याचे सांगून, शुद्धीकरणाच्या नावाखाली आरोपींनी बंदूक, चांदीचे भांडे, सोन्याचे अलंकार, लाकडी साहित्य, सागवानी कपाटे यांसारख्या वस्तूंची चोरी केली.
अंधश्रद्धेचे सावज
या घटनेमुळे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना धक्का बसला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सदस्य सीमा पाटील यांनी या घटनेचा निषेध करत सांगितले की, “भूत, चेटूक, काळी जादू हे सर्व अवैज्ञानिक आणि फसवे प्रकार आहेत. अशा भोंदू बुवांवर विश्वास ठेवणे धोकादायक आहे, ज्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.”
पोलिस तपास सुरू
सध्या या प्रकरणाचा तपास राजवाडा पोलिस करीत आहेत आणि आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.