सांगली पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन केली कारवाई
आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगाराला अटक केली आहे. सॅमसन रुबीन डॅनियल (वय २५), राहणार बेतुरकर पाडा, कल्याण पश्चिम, ठाणे, याला पोलिसांनी सुरत (गुजरात) येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४,५०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अशा प्रकारची आहे गुन्ह्याची माहिती
गुन्ह्याची तक्रार फिर्यादी दतात्रय संपतराव पाटील (वय ४४) यांनी दिली होती. विश्रामबाग, सांगली येथे त्यांचे घर असून, १३ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या घरात दिवसा घरफोडी झाली होती. चोरट्याने ४ लाख ५० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला होता.
विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडीच्या घटना वारंवार घडत असल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्ह्यांच्या तपासाचे आदेश दिले होते.
तपासाचे सूत्र
पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने संशयितांची माहिती काढून गुन्ह्यांचा मागोवा घेतला. तपासादरम्यान पोलीस हवालदार सागर लवटे यांना माहिती मिळाली की, सॅमसन डॅनियल हा गुन्ह्यांमध्ये सामील असून सध्या सुरत येथे आहे. तत्काळ पथक गुजरातला रवाना झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली.
मुद्देमाल हस्तगत
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून कळले की चोरी केलेला ऐवज वांगणी, ठाणे येथे ठेवला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून ४ लाख ५० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालात सोन्याचे नेकलेस, गंठण, लक्ष्मी हार आणि तीन अंगठ्या यांचा समावेश आहे.
आरोपीचा आपराधिक रेकॉर्ड
सॅमसन डॅनियल हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कल्याण, रत्नागिरी, जळगाव, सुरत (गुजरात) आणि खंडवा (मध्य प्रदेश) येथे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरोधातील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार करीत आहेत.
पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.