एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या: गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू
आयर्विन टाइम्स / नागपूर
नागपूर जिल्ह्यातील मोवाड (नरखेड तालुका) येथील पचोरी कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. २) उघडकीस आली आहे. सेवानिवृत्त शिक्षक विजय मधुकर पचोरी (वय ६८), त्यांची पत्नी माला (वय ५३), मोठा मुलगा गणेश (वय ३८) आणि लहान मुलगा दीपक (वय ३५) यांनी एकत्रितपणे आपले जीवन संपवले. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे. मृतांच्या गळफास स्थितीत तिघांचे हात कमरेच्या मागे बांधलेले होते, तर गणेशचे हात मोकळे होते. या घटनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
घटना कशी उघडकीस आली?
मोवाड गावातील वार्ड क्र. ५, बाजार चौक परिसरात ओमप्रकाश खोब्रागडे यांच्या घरी पचोरी कुटुंब किरायाने राहत होते. घटनेच्या रात्री पचोरी कुटुंबातील सर्वजण नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत घरातील सदस्य बाहेर आले नाहीत, म्हणून शेजारच्यांनी खिडकीतून घरात पाहिले असता सर्वजण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. शेजाऱ्यांनी त्वरित नरखेड पोलिसांना याची माहिती दिली.
आत्महत्येमागील संभाव्य कारणे
विजय पचोरी हे २०१६ साली शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा मोठा मुलगा गणेश पचोरी याने पांढुर्णा (मध्यप्रदेश) येथे ‘मातृसेवक इंडिया निधी लिमिटेड’ नावाने पतसंस्था सुरू केली होती. मात्र, या पतसंस्थेत आर्थिक अफरातफर झाल्यामुळे १४ फेब्रुवारी २०२४ रोजी गणेशवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ६ फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर, ८ ऑगस्ट रोजी जामिनावर सुटका होऊन तो घरी आला होता. मात्र, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी देखील आर्थिक फसवणुकीचे व्यवहार त्याच्याशी संबंधित असल्याचे परिसरात बोलले जात होते.
सुसाईड नोट आणि पोलिस तपास
घटनास्थळी पोलिसांनी तपास करताना गणेशच्या बर्मुड्याच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली, ज्यावर पचोरी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सह्या होत्या. या पत्रात “आम्ही चौघेही स्वेच्छेने आत्महत्या करीत आहोत” असे स्पष्ट लिहिले होते. या आत्महत्येमागील गुंतागुंतीचे कारण समजण्यासाठी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. नरखेडचे ठाणेदार अजित कदम, मोवाड पोलिस चौकीचे पोलिस कॉन्स्टेबल संजय इंगोले आणि प्रेमराज सनेसर या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील खरे कारण स्पष्ट होईल.
गंभीर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा इतर अनिश्चित कारणांमुळे पचोरी कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले असावे, असे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबातील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमुळे ते नैराश्याच्या गर्तेत गेले असावेत, असे वाटते.