जतजवळ अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने तरुण जागीच ठार
आयर्विन टाइम्स / जत
जत-शेगाव रस्त्यावर रेवनाळ फाट्याजवळील आड बस थांब्याच्या लगत झालेल्या अपघातात संकेत शिवाजी बोराडे (वय ३०, मूळ रा. शेगाव, सध्या रा. जत) यांचा मृत्यू झाला. संकेत बोराडे यांची मोटरसायकल एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. हा दुर्दैवी अपघात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.
संकेत बोराडे हे शेगाव येथे स्पेअर पार्ट्सचे दुकान आणि सर्व्हिसिंग सेंटर चालवत होते. ते काम आटोपून घरी परतत असताना हा अपघात झाला. आड स्टॉपच्या पुढे jat रोडवरील रस्त्याच्या कडेला त्यांची मोटरसायकल पडलेली आढळली, आणि त्याचवेळी त्यांचा मृतदेहही आढळून आला. तत्काळ त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रात्री साडेनऊ वाजता उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला.
संकेत बोराडे यांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे. ते अविवाहित होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेगाव गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या आठवणींनी सर्वत्र भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
jat पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताच्या वेळी कोणतीही प्रत्यक्षदर्शी व्यक्ती नसल्याने घटनास्थळावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.