सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तासगाव तालुक्यातील डोर्ली फाटा, बलगवडे येथे घडलेल्या खुनाचा गुन्हा उघड केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तासगाव तालुक्यात घरात घुसून केला खून
नवी डोर्ली फाटा, बलगवडे (ता. तासगाव) बुधवारी येथे गणपती शिंदे (ता. २५) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास माजी सैनिक गणपती धोंडिराम शिंदे (वय ६५) यांचा राहत्या घरात डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणपती शिंदे हे भारतीय सैन्य दलातून सुभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी रहातात. त्यामुळे सध्या नवी डोरली फाटा, बलगवडे येथील स्वतःच्या घरात एकटेच राहत होते. आज सकाळी त्यांचा खून झाल्याचे झाल्याचे उघड झाले.
दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता फिर्यादी अमित गणपती शिंदे (वय ३९, राहणार बलगवडे, ता. खानापूर) यांच्या तासगाव तालुक्यातील डोर्ली फाटा, बलगवडे येथील त्यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वडिलांचा खुन केल्याचे समोर आले. मृतक गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५) यांना घरात घुसून, अज्ञात कारणास्तव लोखंडी रॉडने डोक्यावर आणि कपाळावर जबर मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस तपासाची प्रक्रिया
घटनेची माहिती मिळाल्यानंतर, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळाला भेट दिली व गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या नेतृत्वात तपासासाठी पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान, घटनास्थळाचे निरीक्षण आणि गोपनीय माहितीच्या आधारे वैष्णव विठ्ठल पाटील (वय १९, राहणार बलगवडे, ता. तासगाव) याच्यावर संशय निर्माण झाला. संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेतल्यानंतर, पोलीस पथक सोलापूर आणि उस्मानाबाद येथे पाठविण्यात आले. तपासादरम्यान, वैष्णव विठ्ठल पाटील हा देवगाव, (ता. परांडा, जि. उस्मानाबाद) येथे असल्याची माहिती मिळाली आणि तातडीने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
गुन्ह्याची कबुली
संशयितास ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करण्यात आली, ज्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनुसार, मयत गणपती शिंदे यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीचा व्यवहार करून त्यातून पैसे मिळवायचे होते तसेच त्यांनी गाडी परत मागू नये म्हणून त्याने शिंदे यांचा खुन केला.
आरोपीच्या अटकेची प्रक्रिया
वैष्णव विठ्ठल पाटील याला २७ सप्टेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असून, पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
पोलीस तपासणीतील अधिकारी
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, तासगाव पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखेचे निरीक्षक सोमनाथ वाघ, सहा. निरीक्षक पंकज पवार, रुपाली बोबडे, आणि अन्य अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची मोलाची कामगिरी या गुन्ह्याच्या उकल करण्यात आली आहे.
सांगली पोलिसांच्या या तत्पर आणि यशस्वी कारवाईमुळे गुन्ह्याचा त्वरित उलगडा होऊन, आरोपीला अटक झाली आहे.