अनैतिक संबंधांमुळे कुटुंबाची बदनामी होत असल्याची भावना
आयर्विन टाइम्स / मिरज
मिरज तालुक्यातील एरंडोली येथे प्रमोद वसंत जाधव या ३५ वर्षीय तरुणाचा अनैतिक संबंधांमुळे खून झाल्याचे उघड झाले आहे. प्रमोद याचे चुलत भावजयीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे चिडलेल्या धोंडीराम लक्ष्मण माने (वय ४३) याने त्याचा खून केला. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.
घटनेचा तपशील
मंगळवार, दुपारी सुमारे चार वाजता, प्रमोद जाधव याचा खून गावातील तात्यासो पाटील यांच्या शेतात झाला. प्रमोद आणि त्याची चुलत भावजयी तिथे बोलत असताना, धोंडीरामने या दोघांवर पाळत ठेवली होती. प्रमोदच्या अनैतिक संबंधामुळे त्याच्या कुटुंबाची गावात बदनामी होत असल्याने धोंडीराम संतापला होता. त्याच संतापातून त्याने लोखंडी पाते असलेल्या कु-हाडीने प्रमोदवर डोक्यावर, छातीवर, आणि हातावर जोरदार वार केले. प्रमोद गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.
मागील संबंधांवरून निर्माण झालेला तणाव
प्रमोदचे आपल्या चुलत भावजयीशी अनैतिक संबंध गेल्या काही वर्षांपासून होते. या महिलेचा पती निधनानंतर ती विधवा झाली होती. गावातील काही लोकांनी या दोघांना यापूर्वी समजावून सांगितले होते आणि या संबंधामुळे कुटुंबाची बदनामी होत असल्याचे स्पष्ट केले होते. धोंडीरामनेदेखील या विषयावर प्रमोदला अनेक वेळा ताकीद दिली होती. मात्र, प्रमोद आणि विधवा महिलेचे संबंध कायम राहिले, ज्यामुळे धोंडीरामचा राग वाढत गेला.
घटनेचा परिणाम
खुनाच्या वेळी विधवा महिलेने धोंडीरामला प्रमोदला मारू नको, अशी विनवणी केली, मात्र त्याने तिला देखील धमकी देत, मारण्याची भाषा केली. प्रमोद जागीच मृत पडल्यानंतर महिला घाबरून घराकडे पळाली. तपासादरम्यान पोलिसांना शेतात पडलेली महिलेची चप्पल मिळाली, ज्यामुळे पोलिस तिच्या घरी पोहोचले आणि तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, प्रमोदच्या खुनामागे धोंडीराम माने असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करून धोंडीरामला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, धोंडीरामने अनैतिक संबंधांमुळे कुटुंबाची बदनामी होत असल्याचे कारण देत, प्रमोदचा खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांची जलद कारवाई
पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. निरी. भैरू तळेकर, उपनिरीक्षक मुंडे, माने, नदाफ आणि त्यांच्या पथकाने खुनाची घटना घडल्यानंतर अवघ्या बारा तासात आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हा प्रकटीकरण शाखेने तात्काळ तपास करून खुनी शोधण्याची कारवाई केली. गुरुवारी धोंडीराम माने याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.