हद्दपार गुन्हेगारास सापळा रचून पकडले
आयर्विन टाइम्स / विटा
सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे १४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास, विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नेवरी रोड येथे हद्दपार गुन्हेगार प्रशांत ऊर्फ चिंगळ्या विजय गायकवाड याला अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत गोळी जप्त केली.
पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांच्या निर्देशानुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हद्दीतील अवैध धंद्यांवर आणि बिगर परवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस पथकाला पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर, पोलीस हवालदार उत्तम माळी आणि प्रमोद साखरपे यांना गोपनीय माहिती मिळाली की, हद्दपार गुन्हेगार प्रशांत ऊर्फ चिंगळ्या गायकवाड नेवरी रोडमार्गे विटा शहरात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने नेवरी रोडवरील सिध्दीविनायक सृष्टी कमानीजवळ सापळा रचला. हद्दपार गुन्हेगार गायकवाड तेथे पोहोचताच त्याने पोलीसांना ओळखून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तत्काळ पाठलाग करून त्याला अटक केली.
हद्दपार गुन्हेगाराकडील तपासणी दरम्यान, एका मॅगझीनसह लाकडी तपकीरी रंगाच्या ग्रीप असलेले देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत राऊंड (गोळी) मिळाले. त्याच्याकडे पिस्टलसाठी कोणताही परवाना नसल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे त्याच्यावर आर्म्स अॅक्ट १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हद्दपार गुन्हेगार गायकवाडला १५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जप्त मालमत्ता
– देशी बनावटीचे पिस्टल
– एक जिवंत राऊंड (गोळी)
– एकूण किंमत: ₹४०,५००/-
पोलीस ठाणे विटा यांच्या या जलद आणि यशस्वी कारवाईने गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांती व सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे पाऊल उचलले आहे.