एतकल या लहानशा गावात जादूटोणा संशयावरून एका कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या
जगदलपूर/कोंटा: छत्तीसगडच्या बस्तर विभागात अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या आरोपांमुळे उभे राहिलेले एक भयानक हत्याकांड देशभरात चर्चेत आले आहे. कोटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एतकल या लहानशा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येत मरईगुडा पोलिस ठाण्यात कार्यरत मुख्य हवालदाराचाही समावेश आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली, जेव्हा दोन्ही कुटुंबांमधील तणाव एका सामाजिक बैठकीत प्रकट झाला आणि तिथून सुरू झाला नरसंहार.
घटनास्थळावरचा तणाव
रविवारी सकाळी गावातील प्रमुख आणि संबंधित कुटुंबीय एकत्र आले होते. एतकल गावात जादूटोणा आणि अंधश्रद्धा या गोष्टींमुळे खूप दिवसांपासून एक अप्रत्यक्ष तणाव होता. संशय असा होता की वर्षभरापूर्वी एका मुलाचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाला होता, असा संशय हत्याकांड घडवणाऱ्या कुटुंबीयांचा होता आणि याला जबाबदार मृताचे कुटुंब असल्याचा आरोप केला जात होता. या गोष्टीने दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रविवारी सकाळी तडजोड बैठक सुरू असताना, चर्चा सुरू असताना त्याचे पर्यावसान आरोप-प्रत्यारोपांमध्ये झाले. राग आणि संशय अधिक तीव्र झाला, आणि अचानक बैठकीत आलेल्या काही लोकांनी लाठ्या-कुऱ्हाड घेऊन हल्ला केला. तीन महिला आणि दोन पुरुषांना क्रूरपणे मारहाण करून ठार करण्यात आले. हल्लेखोरांनी पीडितांना मारहाण करण्यासाठी काठ्या आणि कुऱ्हाडींचा वापर केला.
हवालदाराचं दुर्दैवी अंत
मृतांमध्ये पोलिस विभागात काम करणारे मुख्य हवालदार मौसम बुच्चा यांचा समावेश आहे. घटनेच्या वेळी ते ड्युटीवर होते, मात्र गावातून फोन करून त्यांना बोलावण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये वादाची तीव्रता वाढल्यावर त्यांना निष्पापपणे या हिंसाचाराचा बळी व्हावे लागले.
गावातील तणाव आणि जादूटोणा
बस्तर विभागातील अनेक गावांमध्ये जादूटोणा आणि अंधश्रद्धा या गोष्टींना अजूनही फार महत्व दिलं जातं. वर्षभरापूर्वी झालेल्या एका मुलाच्या मृत्यूचा बदला घेतल्याचं या हत्येमागचं कारण सांगितलं जात आहे. आरोपींना असं वाटत होतं की मृतांचं कुटुंबच त्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार होतं, कारण त्यांनी जादूटोणा केला होता.
आरोपींना अटक
या सामूहिक हत्येनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये हिडमा, कारम सत्यम, कुंजाम मुकेश, पोडियाम एका आणि अन्य काही आरोपींचा समावेश आहे. घटनास्थळावर तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी गावात कडक बंदोबस्त ठेवला आहे. पुढील तपास सुरू असून, आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
जादूटोणा, अंधश्रद्धेविरुद्ध लढा सुरूच
सुकमा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बस्तर आयजी सुंदरराज पी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना सांगितलं की, “अंधश्रद्धा आणि जादूटोणा ण्यावर विश्वास ठेवून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
या प्रकारामुळे जादूटोणा, अंधश्रद्धेचा समाजावर होणारा परिणाम आणि त्याविरुद्ध असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी या गोष्टींवर पुन्हा प्रकाश टाकला आहे. समाजाच्या अशा अंधश्रद्धाळू प्रवृत्तींमुळे निरपराध जीवांच्या बलिदानाची मालिका अद्यापही थांबलेली नाही, हे विदारक सत्य या घटनेने दाखवून दिलं आहे.