शिक्षक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश
आयर्विन टाइम्स / पुणे
महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी कार्यवाहीबाबत नवे निर्देश जारी केले आहेत. १० सप्टेंबर २०२४ रोजी शासनाने निर्गमित केलेल्या पत्रानुसार, शिक्षक पदभरती (teacher Recruitment) प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्य मुद्दे:
१. बिंदूनामावलीतील त्रुटींची शहानिशा:
सर्व जिल्हा परिषदांनी बिंदूनामावलीतील त्रुटींची शहानिशा करून अद्ययावत बिंदूनामावली सादर करावी. याअंतर्गत, १० टक्के पदे राखीव ठेवण्यात आली होती. नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्रुटीमुक्त बिंदूनामावली प्रमाणित करावी आणि त्यानुसार रिक्त पदांची भरती कार्यवाही करावी.
हे देखील वाचा: Historical game Tug of War: रस्सीखेच : जाणून घ्या एका ऐतिहासिक खेळाचा प्रवास
2. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया:
भरती प्रक्रियेत अपात्र, गैरहजर किंवा रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे, उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संस्थेने या रिक्त पदांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
3. पवित्र पोर्टलवरून जाहिराती:
शासन निर्णयानुसार दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती पवित्र पोर्टलवर घेतल्या जाणार आहेत. या जाहिरातींची कार्यवाही करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना त्यांचे रिक्त पदांचे तपशील अद्ययावत ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
4. एसईबीसी आरक्षणाचा विचार:
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणाचा विचार नवीन जाहिरातींमध्ये केला जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनांनुसार ही प्रक्रिया राबवली जाईल.
शिक्षक पदभरतीसाठी शासनाने दिलेल्या नव्या निर्देशांनुसार सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांनी आवश्यक तयारी करून पवित्र पोर्टलवरून जाहिरात प्रक्रिया सुरू करावी.शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या सहीने आदेश काढण्यात आला आहे.