गांजा विक्री करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत
आयर्विन टाइम्स / सांगली
शहरात अवैध व्यवसायावर कडक कारवाई करत, सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १२ किलो २५० ग्रॅम वजनाचा, अंदाजे २,४०,५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत एक मोटरसायकल आणि मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३,३५,५०० रुपये आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव यासीन शब्बीर मुजावर (वय ३२, राहणार साईनाथनगर, कर्नाळ रोड, सांगली) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६ गांजाचे पुडे जप्त केले असून, ते खाकी रंगाच्या चिकट टेपमध्ये बांधलेले होते. त्यांचे एकूण वजन १२ किलो २५० ग्रॅम आहे. त्याचबरोबर काळ्या रंगाची बजाज ॲव्हेंजर मोटारसायकल (MH-10-CE 145) आणि एक ओपो कंपनीचा मोबाईलही जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांची प्रभावी कारवाई
सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या आदेशानुसार आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी विमला भापोसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, परि. पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर आणि अन्य पोलीस कर्मचार्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कॉर्नीवल हॉटेलसमोर सापळा रचून आरोपीला अटक केली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात अवैध व्यवसाय आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी वरिष्ठ पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. यासीन शब्बीर मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही आर्म्स अॅक्ट आणि दारूसंबंधी गुन्हे दाखल आहेत.
पुढील तपास सुरु
सदर आरोपीकडून गांजा सांगली शहरात विक्रीसाठी आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. सांगली शहर पोलिसांनी भविष्यातही अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
सांगली शहरात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध अमली पदार्थांच्या व्यापारावर मोठा आघात बसला आहे.